टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

On: August 12, 2026 8:49 AM
Follow Us:

सांगोला :

सांगोला शहरातील महूद रोड बायपासवरील जिजाऊ पार्क परिसरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पांढऱ्या रंगाच्या पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, पिस्तुलासारख्या हत्याराचा धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री सुमारे आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी ईश्वर पांडुरंग गवळी व त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन तुळशीराम महांकाळ (वय ३४, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. वासुद, केदार मळा, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास महूद रोड बायपास येथील जिजाऊ पार्क परिसरात फिर्यादी सचिन महांकाळ यांना आरोपींनी अडविले. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या पाईपने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. तसेच पिस्तुलासारख्या हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले.

या लुटीत ४० हजार रुपये रोख, अडीच तोळे वजनाची अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि एक तोळे वजनाची अंदाजे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

लुटीनंतर आरोपी काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहनातून मंगळवेढा-सोलापूर रोडच्या दिशेने पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.लूट केल्यानंतर चोरटे स्कार्पिओमधून पसार होत असताना नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. वंदे मातरम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वाढेगाव नाका, कडलास नाका, वासूद चौक असा पाठलाग करत नागरिक दत्तनगर व शिवाजीनगर परिसरापर्यंत पोहोचले. शिवाजीनगर परिसरात अचानक स्कार्पिओ थांबताच त्यातील पाच संशयित वाहनातून खाली उतरले आणि भिंतीवरून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मात्र, त्यातील ईश्वर पांडुरंग गवळी याला नागरिकांनी पकडले. झालेल्या मारहाणीत त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फॅक्चर झाले. त्याला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७२३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस नाईक जाधव यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now