US vs Iran Conflict: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकन सैन्याने इराणवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईला प्रत्युत्तर देत इराणने बहरीन, कुवेत, इराकमधील अमेरिकेच्या 18 लष्करी तळांवर हल्ला केलाय.

US vs Iran Conflict: पश्चिम आशियातील (Middle East) तणाव आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून, अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात पुन्हा युद्ध पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकन सैन्याने इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईला चोख प्रत्युत्तर देत इराणच्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कोर’ने बहरीन, कुवेत आणि इराक मधील अमेरिकेच्या तब्बल 18 लष्करी तळांवर (Military Bases) ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार मारा केला आहे. या अभूतपूर्व संघर्षामुळे इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सर्व प्रकारच्या जहाजांसाठी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे.
US vs Iran Conflict: अमेरिकेचे 49 टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ले
मंगळवारी इराणने अमेरिकेचे एक हेलिकॉप्टर पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला. अमेरिकन सेंट्रल कमांडने बुधवारी ‘स्वसंरक्षणासाठी’ इराणच्या अनेक तळांना लक्ष्य केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या माहितीला दुजोरा दिला असून, “अमेरिकेने टॉमहॉक क्षेपणास्त्रांसह (Tomahawk Missiles) एकूण 49 क्षेपणास्त्रांद्वारे इराणच्या महत्त्वाच्या भागांवर हल्ले केले आहेत,” असे सांगितले. तसेच इराणच्या नेत्यांनी शांतता करारासाठी खूप उशीर केल्याचा आरोप करत, जर करार केला नाही तर हा शस्त्रसंधी (Ceasefire) मोडून याहून मोठे हल्ले केले जातील, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसथ यांनीही इराणच्या महत्त्वपूर्ण केंद्रांवर बॉम्ब टाकले जातील, असा इशारा दिला आहे.

US vs Iran Conflict: इराणचा अमेरिकेच्या 18 लष्करी तळांवर प्रतिहल्ला; कुवेत-बहरीनमध्ये सायरन
अमेरिकेच्या या हल्ल्यासमोर न झुकता इराणने काही तासांतच भीषण प्रतिहल्ला चढवला. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याच्या पॅट्रियट प्रणालीचे रडार आणि संप्रेषण अँटेना उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय, कुवेतमधील ‘अली अल सलेम’ (Ali Al Salem Base) आणि ‘अहमद अल जुबेर’ एअरबेस, बहरीनचा ‘शेख ईसा’ हवाई तळ आणि इराकच्या इरबिलमधील एअरबेससह एकूण 18 तळांवर इराणच्या जॉइंट मिलिटरी कमांडने मोठा मारा केला. या हल्ल्यानंतर कुवेत, बहरीन आणि जॉर्डनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, कुवेतमध्ये धोक्याचे सायरन वाजवण्यास सुरुवात झाली आहे. बहरीनच्या गृह मंत्रालयाने नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.
US vs Iran Conflict: होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद
या युद्धाचा सर्वात मोठा फटका जागतिक तेल व्यापाराला बसण्याची शक्यता आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या ऑईल टँकर्स आणि व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे बंद केली आहे. इराणच्या लष्कराने इशारा दिला आहे की, “या भागात आलेले कोणतेही जहाज उडवले जाईल, त्यामुळे आंतरराष्ट्रीय जहाजांनी ती आता स्वतःच्या जबाबदारीवर उतरवावीत.” इराणच्या या घोषणेनंतरही अमेरिकी सेंट्रल कमांडने व्यापारी जहाजांची वाहतूक अजूनही सुरू असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, इराणच्या केशम बेट, बंदर अब्बास आणि सीरिक शहरांमध्येही भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

US vs Iran Conflict: “युद्ध फक्त मिडल इस्ट पुरते मर्यादित राहणार नाही”
इराणी संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उघड आव्हान दिले आहे. अजीजी म्हणाले, “आम्ही हारलेल्या लोकांना आणि तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. जर आता युद्ध झाले, तर ते फक्त मिडल इस्टपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते अमेरिकेपर्यंत पोहोचेल. आता अमेरिकन सैनिकांच्या मृतदेहांचा आकडा वेगाने वाढेल.” तर दुसरीकडे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनीही इराण कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
US vs Iran Conflict: संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा
या संपूर्ण परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “पश्चिम आशियातील प्रदेश एका मोठ्या विनाशाकडे आणि खोल संकटाकडे ढकलला जात आहे. सध्याची परिस्थिती ही युद्धविरामाची नसून थेट युद्धाचीच दिसते आहे,” असे सांगत त्यांनी सर्व देशांना तात्काळ हल्ले थांबवून मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
US vs Iran Conflict: भारताने ओमानजवळील जहाजावर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध
दरम्यान, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज जारी केलेल्या एका वक्तव्यात ओमानच्या किनार्याजवळील व्यावसायिक जहाज ‘सेटेबेल्लो’वर झालेल्या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. या जहाजावर 24 भारतीय कर्मचारी होते, त्यापैकी 21 जणांची आतापर्यंत सुटका झाली असून 3 भारतीय अजूनही बेपत्ता आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “आम्ही ओमानच्या किनार्याजवळ आज सकाळी व्यावसायिक जहाज सेटेबेल्लोवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. आमचे ओमानमधील दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्षात ठेवत आहे आणि ओमानी अधिकार्यांसोबत सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी सक्रियपणे समन्वय साधत आहे.” वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, या प्रदेशातील जहाजांवर सातत्याने होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत आणि ते या भागातील सुरू असलेल्या संघर्षाचे थेट परिणाम आहेत. भारताने तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता व स्थिरता पुनर्स्थापित करण्यासाठी तात्काळ कूटनीतिक तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
“या प्रदेशातील व्यावसायिक जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून मुक्त आणि अडथळ्यांशिवाय नेव्हिगेशन आणि व्यापार पुनर्स्थापित केले जावे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत बेपत्ता तीन भारतीयांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.












