महायुतीत कसलेही ‘कोल्ड वॉर’ नाही- एकनाथ शिंदे

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

धुसफूसीच्या अफवांवर सोडले उपमुख्यमंत्र्यांनी मौन

मुंबई, 18 फेब्रुवारीत (हिं.स.) : शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीत कसलीही धुसफूस किंवा शितयुद्ध नसल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी दिली. राज्यातील महायुतीत कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगली असताना शिंदे यांनी मौन सोडत उपरोक्त खुलासा केलाय.

सत्ताधारी महायुतीमधील नेत्यामध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पालकमंत्री पदाचे वाटप झाल्यानंतर 2 दिवसांतच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. मात्र, या संदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही. असे असतानाच आता शिवसेना शिंदे गटाच्या काही माजी मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कुरघोडीचे राजकारण अर्थात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतरपणे राज्याचा कारभार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप-शिवसेनेत कोल्ड वॉर सुरू असल्याच्या मुद्यावर त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही. महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे. राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही. पण, महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2023 नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते याची आठवण शिंदे यांनी करुन दिली.

सत्तेच्या खुर्चीसाठी 2019 मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले, हिंदुत्वाला डॅमेज केले, शिवसेनेला डॅमेज केले, आता आभाळ फाटलेय त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केली. शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरिक्षण करावे असा सल्ला शिंदे यांनी दिला.

read also

मुख्यमंत्री करणार ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे नेतृत्त्व

महिंद्राने ग्राहकांना दिला मोठा धक्का ! आता थार रॉक्स खरेदी करणे झाले महाग; जाणून घ्या नवीन किंमत

सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा ‘ईद’ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon