पाठदुखी ही सौम्य ते तीक्ष्ण असू शकते. काहीवेळा पाठदुखी एवढी वाढते की त्यावर उपचार करण्यासाठी लोकांना औषधांची मदत घ्यावी लागते. पण तुम्ही जर व्यायाम करत असला तेव्हा पाठदुखीच्या बाबतीत विशिष्ट व्यायाम करणे टाळावे. कोणते व्यायाम करणे टाळावे ते जाणून घेऊयात.
पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. आजकाल या समस्येमुळे अनेकांना त्रास होत आहे. पाठदुखीची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. चुकीच्या बसण्याच्या सवयी, जास्त वजन, अयोग्य आहार, हेल्दी आहार न खाणे किंवा जुनी दुखापत ही कारणे असू शकतात. तर अनेक लोक पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी व्यायामाचा अवलंब करतात. पण काही व्यायाम असे आहेत ज्यामुळे पाठदुखी आणखी वाढू शकते. अनेकदा असे दिसून येते की लोक जीममध्ये जाऊन कोणताही व्यायाम करू लागतात, ज्यामुळे पाठदुखी आणखीन वाढू शकते. पाठदुखीची समस्या सतावत असते तेव्हा कोणते व्यायाम करू नयेत हे आम्ही या लेखात सांगणार आहोत.
स्ट्रेट लेग रेज
जर तुम्हाला आधीच पाठदुखीचा त्रास होत असेल तर हा व्यायाम करू नका, यामध्ये व्यक्तीने पाठीवर झोपून एक पाय सरळ वर उचलावा. जेव्हा कंबरेच्या स्नायूंमध्ये आधीच तणाव असतो तेव्हा हा व्यायाम आणखी धोकादायक बनतो. यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, ज्यामुळे वेदना आणखी वाढू शकते.
सिट-अप्स
सिट-अप्स केल्याने तुमचे पोटाचे स्नायू मजबूत होतात, परंतु जर तुम्ही पाठदुखीच्या वेळी असे केले तर ते तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकते. या व्यायाम करताना तुमच्या कंबरेवर दबाव येतो. जेव्हा तुम्ही सिट-अप्स करताना वर उठता तेव्हा तुमच्या मणक्यावर दबाव येतो, ज्यामुळे पाठदुखी जास्त होऊ शकते आणि दुखापत होण्याचा धोका देखील वाढतो.
उंच उड्या
उंच उडी हा एक उच्च तीव्रतेचा व्यायाम आहे. पाठदुखीच्या बाबतीत हा व्यायाम करू नका. जर तुमचे स्नायू किंवा हाडे आधीच कमकुवत असतील तर हा व्यायाम केल्याने तुम्हाला दीर्घकाळात समस्या निर्माण होऊ शकतात.
रोमन खुर्ची
जर तुम्हाला पाठदुखी असेल तर हा व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते. या व्यायामात शरीर एका विशिष्ट कोनात वाकलेले असते, ज्यामुळे पाठीवर अतिरिक्त दबाव येतो. जर पाठीच्या कण्याला किंवा पाठीच्या स्नायूंना काही दुखापत झाली असेल तर ती आणखी गंभीर असू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)