सोलापूर: सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतानाच सोलापुरात चोरट्यांनीही दिवाळी साजरी केली आहे. मड्डीवस्तीतील नागणे अपार्टमेंटमधील घर भरदिवसा उघडून साडेसहा तोळ्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.
रेखा अण्णाराव माने (वय- ६०, रा. नागणे अपार्टमेंट, दत्त मंदिरासमोर, भवानी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पोलीस ठाण्यात या घरफोडीची नोंद करण्यात आली आहे. माने या शुक्रवारी सकाळी आपल्या घराला कुलूप लावून बाळवेशीत कामानिमित्त गेल्या होत्या. सायंकाळी चार वाजता परतल्यावर त्यांना घराच्या ग्रीलचे व दरवाजाचे कुलूप उघडल्याचे दिसून आले.
घरात प्रवेश केल्यावर चोरट्याने घरात शोधा शोध करून कपाटाला अडकवलेली चावी घेऊन कपाट उघडून आतील लाॅकरमधील आठ ग्रॅमची बोरमाळ, तीन तोळ्याची मोहनमाळ, पाच ग्रॅमच्या तीन अंगठ्या सोन्याची गणस्माळ, गंठण आणि पाच हजाराची रोकड चोरून नेल्याचे दिसून आले.
भर दिवाळीत दाट लोकवस्तीत दिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. सोन्याचा ऐवज सव्वा तीन लाखाचा असला तरी पोलिसांनी जुन्या बाजारभावाप्रमाणे एक लाख नव्वद हजाराची नोंद घेतली आहे. पुढील तपास सपोनि पवार हे करीत आहेत.