सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्यासाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:साठी नाही तर गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी मते मागत आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
यावरून आधी शहांनी प्रत्युत्तर दिले तर आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही उत्तर दिले आहे. केजरीवाल यांच्या दाव्यावर राजनाथ म्हणाले की, मोदी 2024 मध्येच नव्हे तर 2029 मध्येही देशाचे पंतप्रधान होतील. ज्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवली, ज्याने भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात मजबूत बनवली, अशा व्यक्तीला हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपचा एक वरिष्ठ नेता असल्याने मी स्पष्टपणे सांगू शकतो की, मोदी 2029 मध्येही भारताचे पंतप्रधान होतील. एका वृत्तसंस्थेशी बोलताना राजनाथ यांनी मोठा दावा केला.