सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवेसना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना धारेवर धरले आहे. नुकतेच निलम गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकर यांचे निवेदन वाचून दाखवले. ज्या निवेदनात राऊतांवर पाटकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाटकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी माझ्या आईसोबत सांताक्रुझ येथे राहते. राऊत हे माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करत आहेत. मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग होतो. 3 मे ला देखील माझा BKC येथे पाठलाग झाला. याआधी देखील माझ्यावर हल्ला झाला आहे. राऊत यांच्या गुन्हा दाखल आहे पण अजून काहीच कारवाई करण्यात आली नाही. राऊत यांनी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्टार गुप्तहेर नेमले आहेत. यातील एका अटक झाली असली तरी राऊतांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
दरम्यान, राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणांमध्ये पाटकर यांनी मोठे खुलासे केले होते. त्यानंतर राऊत यांनी पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली होती.