टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर 27 सप्टेंबरला मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, वेळापत्रकात बदल

On: September 26, 2026 12:09 AM
Follow Us:

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या काही जलद लोकल माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे संबंधित प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी सुमारे १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागू शकतो.

ठाण्याहून सुटणाऱ्या काही अप जलद लोकल मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच खोपोली-सीएसएमटी लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, दुपारी १.४८ ऐवजी ती दुपारी २.०६ वाजता सुटणार आहे.

हार्बर मार्गावरही ब्लॉक

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच या स्थानकांहून सीएसएमटीकडे येणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्री जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर वसई रोड-भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवार, २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२.३० ते रविवार पहाटे ४.३० पर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार नाही.

त्यामुळे रविवारी मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून आणि रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now