Maharashtra Weather Updates Rain Marathi News: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत चक्रवाती वादळात बदलण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत चक्रवाती वादळात बदलण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचू शकते.या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. याचदरम्यान आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 1 ते 4 नोव्हेंबर 2026 दरम्यान काही भागात अवकाळी किंवा स्थानिक वातावरणाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात 1, 2, 3 आणि 4 नोव्हेंबर दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात किंवा स्थानिक वातावरणाने वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रीत अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असं पंजाबराव डख म्हणाले.
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार? (Maharashtra Weather Updates Rain News)
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह सरी पडण्याची अधिकची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. कोल्हापूर जिल्हा आणि घाटमाथा परिसरात मेघर्जनेसह सरी पडू शकतात. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. तर मराठवाडा विभागातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस- (Chhatrapati Sambhajinagar Rain News)
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये हलकासा पाऊस झाला. या पावसामुळे थोडा गारवा निर्माण झालाय. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला होता. मात्र पूर्ण पावसाळा कोरडा गेल्यामुळे चातकासारखी सर्वजण पावसाची वाट पाहतायत. आज दुपारी शहर परिसरात ढगाळ वातावरण आणि हलकासा पाऊस झाल्याने आणखी येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
बीडमध्येही पावसाच्या हलत्या सरी- (Beed Rain News)
बीडच्या आष्टी मध्ये पावसाने हजेरी लावल्याच दिसून आलंय. काल सायंकाळी ढग दाटून आल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र अद्यापही संपूर्ण बीड जिल्ह्यात बळीराजासह नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.हा पाऊस पडणार कधी यासाठी बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत.








