चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (DICS) होणार आहे. या सामन्याकडे करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं असून सामन्याचा निकाल काय लागेल हे येणारा काळच सांगेल. पण दुबईतील एकदिवसीय सामन्यातील दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड बघितले तर टीम इंडियाने पाकिस्तानला पूर्णपणे पछाडल्याचे चित्र आत्तापर्यंत दिसलं आहे. 50 ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या मैदानावर आत्तापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळा भारताने विजय मिळवला आहे. उद्या, हे दोन्ही संघ दुबईत तिसऱ्यांदा एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
याच निमित्ताने भारत-पाकिस्तान यांची दोन्ही वेळेस कधी चकमक झाली? टीम इंडियाने किती फरकाने सामना जिंकला? सविस्तर जाणून घेऊया.
पहिल्यादा 162 धावांतच गुंडाळला पाकिस्तानचा डाव
2018 साली झालेल्या आशिया चषकादरम्यान या मैदानावर भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात भिडले. 19 सप्टेंबर 2018 रोजी दोन्ही संघांमध्ये ग्रुप स्टेज सामना खेळला गेला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव अवघ्या 162 धावांत आटोपला. बाबर आझमने 47 तर शोएब मलिकने 43 धावा केल्या. या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराहच्या खात्यात दोन विकेट आल्या. कुलदीप यादवने एक विकेट घेतली. तर पाकिस्तानने दिलेले 163 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 29 ओव्हर्समध्येच पार केले. रोहित शर्माने 39 चेंडूत 52 धावांची तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावांची खेळी खेळली. अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या दोघांनीही नाबाद 31-31 धावा केल्या.
दुसऱ्या वेळीही भारताचा 9 विकेट्सनी विजय
तर पहिल्या लढतीनंतर अवघ्या चार दिवसांनी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा त्याच मैदानावर आमनेसामने आले. हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी दुसऱ्यांदा 23 सप्टेंबरला एकमेकांशी भिडले होते. सुपर 4 मध्येही पुन्हा एकदा पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली मात्र भारताविरुद्ध मोठी धावसंख्या करण्यात पाकिस्तानी संघ अपयशी ठरला. पाकिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 7 गडी गमावून केवळ 237 धावा केल्या. शोएब मलिकने सर्वाधिक 78 धावा केल्या. या सामन्यात भारतातर्फे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यावेळी पाकिस्तानने दिलेले 238 धावांचे लक्ष्य भारताने 39 षटकांत पार केले. आव्हानाचा पाठलाग करतानारोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनीही उत्तम खेळी करत शतकही झळकावले. रोहितने 119 चेंडूत 114 तर शिखरने 100 चेंडूत 114 धावा केल्या होत्या.
त्यामुळे आत्तापर्यंत दुबईत झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताचेच पारडे जड असल्याचे दिसून आले. आता उद्या होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध विजयाची हॅटट्रिक करतो की पाकिस्तानी संघ बदला घेतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.