सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; बुधवार दि.18 जून 2025

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

 

सांगोला: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अनोखा निषेध

गांधीगिरी स्टाईलने महसुल सहाय्यकाचा गुलाबपुष्प देऊन सन्मान

सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला येथे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सरकारचा पगार घेऊन गोरगरीबांची कामे करत नाही, सारखे टाळाटाळ करतात म्हणून काल मंगळवार दि.17 जून रोजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी एका महसुल सहाय्यक या शासकीय कर्मचार्‍याचा गुलाबपुष्प देवून सन्मान करत निषेध केला.
दत्तात्रय सावंत यांनी माहिती अधिकार नियमाखाली सांगोला तालुक्यातील अधिकृत खडी क्रशरचे परवाने व त्या त्या संबंधातील सर्व कागदपत्रांची माहिती मिळणेबाबत मागणी केली होती. परंतू तहसीलदार यांचे आदेशान्वये संबंधीत अधिकार्‍यांना 14 तारखेला माहिती देण्यास सांगितले होते तरीही संबंधीत महसुल सहाय्यक यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधीत महसुल सहाय्यकाचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
’सरकारी काम आणि दहा महिने थांब’ याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे.तालुक्यात तहसील कार्यालयात मोठा भ्रष्टाचार फोफावत चालला आहे. ही धोक्याची घंटा आहे. प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष द्यावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी., असेही मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दत्तात्रय सावंत यांनी केले आहे.

सांगोला विद्यामंदिरचे एमएचटी-सीईटी परीक्षेत सुयश

सांगाेला विद्यामंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय

सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनातर्फे स्टेट कॉमन एट्रन्स टेस्ट सेल कडून घेण्यात आलेल्या पीसीएबी- एमएचटी-सीईटी.परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. यामध्ये प्राची बापूसाहेब बाबर 98.02, मानसी मधुकर सुरवसे 97.57 ,रुपेश राजकुमार गाटे 96.35 पर्सेंटाइल मिळवत सुयश संपादन केले.तसेच 8 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त
पर्सेंटाइल मिळविले या सर्व विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेज मधील शास्त्र शाखेतील शिक्षकांचे व मेरिट होम शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर,काकासो नरूटे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या कन्येचा शासकीय अंगणवाडीत प्रवेश

लोकशाही मूल्यांचा आदर्श उदाहरण- पेनुर अंगणवाडी केंद्रात अमूल्या निकिता देशमुख यांचे नावनोंदणी

सांगोला (प्रतिनिधी):- लोकनेते कै. भाई डॉ. गणपतराव देशमुख यांची नात व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपली कन्या अमूल्या निकिता बाबासाहेब देशमुख हिला जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत येणार्‍या पेनुर येथील अंगणवाडी केंद्रात दाखल करून समाजामध्ये एक सकारात्मक आणि अनुकरणीय संदेश दिला आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे स्वतः उच्च शिक्षण घेतलेले असून त्यांनी आपली मुलगी खाजगी शाळेऐवजी सरकारी अंगणवाडीत प्रवेशित करून शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधोरेखित केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात बालविकास विभागात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका, सहायिका, पालक वर्ग तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय हे दाखवून देतो की, शासकीय सेवा, विशेषतः बालविकास योजनांतर्गत असलेल्या अंगणवाड्याही दर्जेदार आणि विश्वासार्ह असू शकतात.
अनेकदा सामान्य जनतेमध्ये शासकीय अंगणवाड्यांबाबत शंका अथवा अनास्था आढळून येते. मात्र, लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेऊन या व्यवस्थेवर विश्वास दाखवणे हे शासकीय यंत्रणेतील कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारे ठरत आहे. सर्वांना समान संधी या लोकशाही तत्त्वाशी सुसंगत असा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या या कृतीमुळे ग्रामीण भागातील पालक वर्गातही नव्याने सरकारी शिक्षण संस्थांकडे वळण्याचा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे.

अशुतोष भोसेकर याचे एमएच-सीईटी इंजिनिअरिंग एंट्रन्स परीक्षेमध्ये घवघवीत यश

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील सुप्रसिद्ध कृषी तज्ञ श्री.केशवराव उर्फ नानासो भोसेकर यांचे नातू तसेच सुप्रसिद्ध विधीज्ञ अँड.देवदत्त भोसेकर यांचे चिरंजीव अशुतोष भोसेकर याने एप्रिल 2025 मध्ये झालेल्या एमएच-सीईटी इंजिनिअरिंग एंट्रन्स परीक्षेमध्ये 98.99% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
अशुतोष भोसेकर याचे प्राथमिक शिक्षण माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचे उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे झाले. तसेच माध्यमिक शिक्षण फॅबटेक पब्लिक स्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण घोडावत कॉलेज अकॅडमी येथे झाले आहे. नुकतेच एप्रिल 2025 मध्ये झालेल्या महाराष्ट्र एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये अशुतोष देवदत्त भोसेकर याने 98.99% परसेंटटाईल गुण मिळवून यश संपादन केले आहे.
अशुतोष च्या यशामध्ये सक्सेस क्लासेस सांगोलाचे श्री मयूर महामुनी सर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या या यशामध्ये आजी,आजोबा, आई-वडील तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गामधील संयुक्त मोजणी संदर्भात आज आढावा बैठक

सांगोला(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग अंतर्गत सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गामधील संयुक्त मोजणी संदर्भात 18 जून 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय सांगोला येथे आढावा बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
सदर बैठकीस पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग अंतर्गत सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गामधील 1) पाचेगांव, 2) एखतपुर, 3) अजनाळे, 4) बंडगरवाडी (चोपडी), 5) सांगोला, 6) कमलापूर, 7) कोंबडवाडी, 8) नाझरे, 9) बलवडी, 10) चोपडी, 11) मांजरी, 12) वझरे, 13) मेथवडे, 14) चिंचोली, 15) संगेवाडी, 16) चिणके, 17) यलमार मंगेवाडी 18) नाझरे, 19) कोळा, 20) बामणी, 21) देवकतेवाडी ही गावे बाधित झालेले असुन सदर गावे समाविष्ठ आहेत.सदरची बैठक संयुक्त मोजणी संदर्भात बैठक होणार आहे.
तरी सदर बैठकीस बाधित गावातील सरपंच / ग्रामपंचायत अधिकारी यांनी अदयावत माहितीसह उपस्थित रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.

आठवडा बाजार दिवशी जड वाहनांची वाहतूक थांबवून बायपास मार्गाने करावी

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील आठवडा बाजार दिवशी सांगोला-पंढरपूर रोडवरील मोठ्या जड वाहनांची वाहतूक थांबवून बायपास मार्गाने करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सांगोले शहरातील रविवारच्या आठवडा बाजारात तालुक्यातील असंख्य व्यापारी , शेतकरी बांधव मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. त्याचवेळी वाडेगाव नाका ते पंचायत समिती पर्यंत वाहतुकीच्या लांबच लांब रांगा दिसतात त्यामुळे नागरिकांना महिला वर्गांना बाजार करणार्‍या व्यापार्‍यांना वृद्धांना त्याचा खूप त्रास होत आहे. छोटे मोठे अपघात बाजार दिवशी घडताना दिसतात तसेच रस्त्यावर असंख्य मोटरसायकली पार्क केल्याने अधिकच वाहतुकीची कोंडी व नागरिकांचे हाल होत आहेत.
त्यातच बाजारात मोबाईल पासून पैसे दागिने पाकीट चोरी यांचे असंख्य प्रमाण वाढले आहे. वारंवार प्रशासनाला दिसून देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यावर अद्याप पर्यंत कोणताच तोडगा निघत नाही मोठा अनर्थ घडण्याच्या अगोदर याबाबत प्रशासनाने सतर्क राहून रविवारच्या दिवशी अधिकचे वाहतूक पोलिसांची नेमणूक करून जड वाहनांचा मार्ग बदलून बाजारातल्या अतिक्रमण मागे सारून व्यापारी वर्ग व शेतकरी बांधवांना योग्य ठिकाणी बसवण्याची व्यवस्था करावी त्यामुळे शहरातील नागरिकांना बाजार करणे सुरक्षित होईल याची पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सिव्हील इंजिनिअर असोसिएशनच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द – आ.बाबासाहेब देशमुख

सिव्हिल इंजिनियर असोसिएशन सांगोला यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सिव्हिल इंजिनियर असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासत पुरस्कार देवून गुणवंत कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ही बाब कौतुकास्पद असून सिव्हील इंजिनिअर असोसिएशनच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
सिव्हिल इंजिनियर असोसिएशन सांगोला यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील गुणवंत कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक 14 जून रोजी दुपारी 3.30 वाजता सांगोला अर्बन बँकेच्या सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी आ.देशमुख बोलत होते. व्यासपीठावर सुभाष लऊळकर सर, सिव्हील इंजि.असो.चे अध्यक्ष इंजि.संतोष भोसले, इंजि.विलास बिले, उपाध्यक्ष इंजि.निलेश माने, इंजि.आकाश म्हेत्रे उपस्थित होते.
यावेळी सुभाष लऊळकर सर यांनी श्रम, प्रतिष्ठा, जिद्द, चिकाटी, परिश्रमांवर जीवनात सर्व काही साध्य करता येते असे सांगत पुरस्कार प्राप्त सर्वांचे कौतुक करुन अभिनंदन केले.
यावेळी श्री.संजय गोडसे, श्री.शहाजी रणदिवे, श्री.संतोष केदार, श्री.मोहन गुडदौरु,श्री.नवनाथ राऊत,श्री.हरीप्रसाद पतंगे, श्री.किशोर गाडेकर, श्री.संतोष तेली, श्री.रमेश गोडसे, श्री.संभाजी टाकळे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सिव्हिल इंजिनियर असोसिएशन सांगोलाकडून मिळालेल्या पुरस्कारामुळे आम्ही केलेल्या कामाचे फलित मिळाले आहे. पुरस्कारामुळे आता आमच्या खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. पुरस्कारासाठी आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल सिव्हील इंजि.असोसिएशनचे मोहन गुडदौरु, नवनाथ राऊत, संतोष केदार यांनी आभार मानले.
यावेळी इंजि.मधुकर कांबळे व इंजि.निलेश माने यांनी बांधकाम क्षेत्रातील अडचणी, समस्या मांडत असोसिएशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, पुरस्कार प्राप्त सर्वांचे कुटुंबिय, नातेवाईक उपस्थित होते. प्रास्ताविकात असोसिएशनचे अध्यक्ष इंजि.संतोष भोसले यांनी पुरस्कार देण्यामागील हेतू स्पष्ट करत असोसिएशनच्या कामाकाजाची सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन राहुल टकले यांनी तर आभार इंजि.विलास बिले यांनी मानले.

सांगोला महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून सन्मान

सांगोला, (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने नुकतेच आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाकडून कार्यशाळा व पुरस्कार वितरण कार्यक्रमात 2004 पासून उत्कृष्ठ कार्य करणारे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्य करणार्‍या सांगोला महाविद्यालयातील प्रा. डॉ. मालोजी जगताप, प्रा. डॉ. विधीन कांबळे व प्रा. डॉ. बबन गायकवाड यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. जगताप, डॉ. कांबळे आणि डॉ. गायकवाड यांनी एन.एस.एस. माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक जागृती, पर्यावरण संरक्षण, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहिमा, महिला सक्षमीकरण व युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले. त्यांच्या कार्यशैलीमुळे महाविद्यालयाचा एन.एस.एस. विभाग विद्यापीठ पातळीवर एक आदर्श ठरला आहे. याप्रसंगी या वर्षाचे प्रकल्प अधिकारी डॉ. सदाशिव देवकर यांना ही मा. कुलगुरू यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे एन.एस.एस. समन्वयक, महाविद्यालयाचे प्राचार्य व विविध महाविद्यालयांचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त प्रकल्प अधिकारी यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

मोहन हॉस्पिटल मध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी यशस्वी

सांगोला (प्रतिनिधी):- मोहन हॉस्पिटल, सांगोला येथील नव्याने सुरु करण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये नुकतीच पहिली कोरोनरी अँजिओग्राफी यशस्वीपणे पार पडली. एका तरूण 35 वर्षाच्या युवकाला हृदय विकाराचा झटका झाल्यानंतर तातडीने थ्रोम्बोलायसिस करण्यात आले आणि नंतर त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आणि रुग्णाचे प्राण यशस्वीरित्या वाचवले गेले.
ही ऐतिहासिक प्रक्रिया हृदयरोगतज्ञ डॉ.बसवराज सुतार व एम.डी.डॉ.मकरंद येलपले यांच्या कौशल्यपूर्ण मार्गदर्शनाखाली पार पडली. कॅथलॅबमध्ये बसवण्यात आलेली आधुनिक डिजिटल इमेजिंग प्रणाली व उच्च क्षमतेची उपकरणे ही ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हृदयरोग निदान व उपचारासाठी एक मोठे पाऊल आहे.
मोहन हॉस्पिटलचे संचालक डॉ.मकरंद येलपले यांनी गेल्या काही वर्षांत सांगोला व परिसरातील रुग्णांना हृदयविकाराचे अचूक निदान व प्रभावी उपचार देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता नव्या कॅथलॅबमुळे परिसरातील रुग्णांना शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा ग्रामीण भागात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी एक नवीन आशा बनून उभी राहिली आहे. मोहन हॉस्पिटल भविष्यात आणखी प्रगत हृदयसेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon