सांगोला (प्रतिनिधी):- 1 जुलै डॉक्टर्स डे सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने सांगोला पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सांगोला तालुक्यातील पहिले एम.एस. सर्जन डॉ. अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन, सांगोला यांच्यावतीने सर्व डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत मेडिकल व सर्जरी क्षेत्रातील गौरवशाली कामगिरी बद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला पहिला अतिदक्षता विभाग, पहिलं सीटी स्कॅन सेंटर, पहिलं सोनोग्राफी सेंटर, पहिलं डायलिसिस युनिट, पहिलं सुसज्ज ऑपरेशन थिएटर डॉ.अमर शेंडे सर यांच्या आनंद हॉस्पिटलमध्येच कार्यरत झालं. आनंद हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं ते पहिलं आयएसओ मानांकन प्राप्त हॉस्पिटल आहे.
वैद्यकीय व सर्जरी क्षेत्रांमधील डॉ.शेंडे यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन डॉक्टर्स असोसिएशन यांचेकडून डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉ.शेंडे यांना सपत्नीक जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला.