Legislative Council Congress : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचं आख्यान अजून काही मार्गी लागलेलं नाही. विरोधकांकडून सरकारच्या भूमिकेवर टीका होत आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महायुतीत रस्सीखेच दिसून येत आहे. अंबादास दानवे यांचा या पदावरील कार्यकाळ संपणार आहे, तोवर काँग्रेसने फिरकी टाकून पाहिली आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे. सरकारने हा मुद्दा सभापतींकडे टोलवला आहे. तर दुसरीकडे उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदाचा कार्यकाळ संपणार आहे. काल परवा त्यांचा निरोप समारंभ चांगलाच रंगला. या पदावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेसच्या या फिरकीने हे पद त्यांच्या पदरात पडते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी पडद्याआड मोठ्या घडामोडी घडत आहे. हे पद काँग्रेसच्या झोळीत पडेल का? याविषयीची खलबंत सुरू झाली आहेत. लवकरच विरोधी पक्षनेता कोण याची घोषणा होईल.
काँग्रेसचा विरोधी पक्ष नेते पदावर दावा
विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना गळ घातल्याची माहिती समोर येत आहे. काल हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असताना यावेळी ही विनंती केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीत काँग्रेसचे सर्वाधिक 8, शिवसेनेचे 6 तर शरद पवार गटाचे 3 आमदार आहेत.
काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव चर्चेत
संख्याबळानुसार काँग्रेसला हे पद मिळावे अशी मागणी सपकाळ यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे. काँग्रेसने सतेज पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव चर्चेत आहे. अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत २९ ऑगस्टला संपत आहे. तोपर्यंत ते विरोधी पक्षनेतेपदावर कायम राहू शकतात. त्यानंतर हे पद काँग्रेसला मिळावे यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभेत जोपर्यंत विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत विधान परिषदेत संख्याबळावर काँग्रेसने या पदावर दावा ठोकला आहे.
विधानपरिषदेतील आमदारांचे संख्याबळ
उद्धव ठाकरेंचे आमदार
- उद्धव ठाकरे
- मिलिंद नार्वेकर
- ज मो अभ्यंकर
- अनिल परब
- सुनील शिंदे
- सचिन अहिर
- अंबादास दानवे (ऑगस्टपर्यंत)
काँग्रेसचे आमदार
- सतेज पाटील
- प्रज्ञा सातव
- भाई जगताप
- अभिजीत वंजारी
- धीरज लिंगाडे
- राजेश राठोड
- जयंत आसगावकर ( पुणे शिक्षक मतदार संघ )
- सुधाकर आडबाले ( नागपूर शिक्षक मतदार संघ ) (काँग्रेस पुरस्कृत संघटनेचा आमदार काँग्रेसला पाठिंबा)