सांगोला ( प्रतिनिधी)- सांगोला शहरा नजीक सांगोला- पंढरपूर महामार्गाच्या बाजूस ब्रह्मओढा हा विस्तृत जलाशय आहे. विस्तीर्ण जलाशय, लहान-मोठ्या माशांची पुष्कळ उपलब्धता, निसर्गमय व निरव शांतता असणारा हा परिसर तसेच त्यालगत असणारा शेतीचा भाग हा अनेक स्थानिक व परदेशी पक्षांसाठी नंदनवन ठरला आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने परदेशी पाहुण्या पक्षांनी त्यांच्या परतीचा प्रवास सुरू केला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने मात्र स्थानिक पक्षांना तलावातील मासे पकडणे सहज सोपे झाले आहे. या कारणामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यावर ऐन उन्हाळ्यामध्ये सकाळी व संध्याकाळी ब्रह्म ओढ्यावर स्थानिक पक्षांची मांदियाळी पाहायला भेटत आहे.

सांगोल्यातील पक्षी व वन्यजीव अभ्यासक आणि सांगोला महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारी प्रा डॉ प्रकाश बनसोडे हे ब्रह्म ओढ्यावर पक्षी निरीक्षणासाठी गेले असता त्यांना विविध प्रकारचे सुंदर व आकर्षक स्थानीक पक्षी मोठ्या संख्येने आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने किंगफिशर म्हणजेच खंड्या पक्षी याच्या सामान्य खंड्या, कवडा खंड्या व पांढऱ्या छातीचा खंड्या अशा तिन्ही प्रजाती आढळून आल्या. हे पक्षी पाण्यामध्ये सूर मारून मासा पकडण्यामध्ये पारंगत असतात. तसेच त्यांना पानकोंबडीच्या पांढऱ्या छातीची पानकोंबडी किंवा लाजरी आणि जांभळी पानकोंबडी या दोन प्रजाती आढळल्या. बदकांमधील भारतीय हळदी-कुंकू बदके तसेच वारकरी बदके मोठ्या संख्येने येथे पहावयास भेटतात. तर पाणथळी जवळ आढळणारे लहान व मोठे पानकावळे, पानलावा,धारीदार बगळा, चमचा पक्षी, राखी बगळा, भारतीय मोठा बगळा, ढोर बगळा, ढोकरी किंवा वंचक, ठिपकेवाला तुतारी, चिखल्या, शेकाट्या, काळया डोक्याचा तसेच लाल डोक्याचा शराटी इत्यादी पक्षी परिसरात आढळले. तसेच आकाराने लहान असणारे लखलखता शिंजीर, राखी वटवट्या, शुभ्रकंठी, कवडा गप्पीदास, सुगरण, वेडा राघू, कोतवाल, गाणंपक्षी असणाऱ्या दयाळांच्या विविध प्रजाती, स्थलांतर करून येणाऱ्या धोबी पक्षांच्या कवडा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी अशा विविध प्रजाती नोंदवता आल्या.

माळरानावर आढळणारे टिटवी, खाटीक, उदी खाटीक हे पक्षी देखील आढळतात. ओढ्या जवळील बाभळीच्या झाडांवर सुगरणीने विणकाम करून मोठ्या संख्येने घरटी उभी केली आहेत. सुगरणीकडून वापरात नसलेल्या या घरट्यांमध्ये शुभ्र कंठी मुनियांचे वास्तव्य आढळते. या लहान पक्षांच्या सोबतच आकाराने मोठे असणारे पक्षी यामध्ये चित्रबलाक व लोकरी मानेचा करकोचा हे मोठ्या संख्येने आढळतात. सदर परिसरात बाजार कृषी उत्पन्न समितीचे धान्याची गोदामे असल्याने उंदरांची संख्या मोठी असून त्यांची शिकार करण्यासाठी, पिंगळा हे लहान आकाराचे घुबड, भारतीय घार तसेच शिक्राघार, कापशी घार हे शिकारी पक्षी देखील वास्तव्यास आहेत. तसेच छोटा होला, कंठेरी होला, कंठेरी पोपट आणि कबुतरे मोठ्या संख्येने आश्रय घेतात. ब्रह्म ओढ्या जवळील शेतांमध्ये मोर व तितर हे पक्षी आढळतात. सांगोला शहरा लगत असणाऱ्या ब्रह्म ओढ्याचे पक्षांचे नंदनवन म्हणून संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. या कामी सांगोला वनविभाग, पक्षी व प्राणी प्रेमी संघटना, नगरपरिषद प्रशासन व नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
संबंधित बातम्या
सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उदघाटन संपन्न
सांगोला येथे पिकअप-दुचाकीची जोराची धडक; 1 जण ठार
3 ऑगस्ट रोजी जन्माला येणार्या मुलींच्या नावे 15 हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचा संकल्प
डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल मध्ये स्व.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
बलवडी येथे महाआरोग्य शिबिर, रक्तदान, डोळे तपासणी संपन्न
आशिया खंडातील थोर पक्षी तज्ञ डॉ. सलीम अली यांच्या मते सोलापूर जिल्हा हा पक्षांच्या जैविक विविधते च्या दृष्टीने निसर्ग समृद्ध आहे. सांगोला तालुक्यात देखील विविध जलाशय l,पाणथळेची ठिकाण, शेती परिसर व माळरान असल्याने पक्षांच्या व सस्तन प्राण्यांच्या विविध प्रजाती येथे आढळतात. ब्रह्म ओढ्यावर पन्नासहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात असे मत प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी व्यक्त केले. या पक्षांना परिसरातील मोठ्या संख्येने वाढलेल्या भटक्या कुत्र्यांकडून जखमी करणे किंवा मारून खाणे असे प्रकार घडत आहेत. या भटक्या श्वानांचा सांगोला नगरपरिषदेने तात्काळ बंदोबस्त करावा व पक्षांचे संरक्षण करावे अशी मागणी सांगोल्यातील पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी केली आहे.
– प्रा. डॉ. प्रकाश अरुण बनसोडे – पक्षी व वन्यजीव अभ्यासक, सांगोला
– प्रा. डॉ. प्रकाश अरुण बनसोडे – पक्षी व वन्यजीव अभ्यासक, सांगोला



