टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Baramati Election Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला! ‘विकासाची पंढरी’ असलेल्या बारामतीतून रणशिंग

Baramati Election Sunetra Pawar: अजितदादा जेव्हा जेव्हा निवडणुकीला सामोरे जायचे, तेव्हा ते इथे मारुतीरायाचे दर्शन घ्यायचे, असं म्हणत आदिती तटकरे भावूक झाल्या.

बारामती: बारामती लोकसभा (Baramati Election) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज भावनिक वातावरणात फोडला. यावेळी मारुतीरायाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी जय पवार, ऋतुजा पवार, मंत्री अदिती तटकरे, सना मलिक, सरोज अहिरे, ज्योती मेटे, अंकिता पाटील, आमदार सुनील शेळके, सचिन पाटील, वीरधवल जगदाळे, मंत्री संजय बनसोडे यांच्यासह महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी भाषणात बोलताना अजितदादांची उणीव आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या, त्यावेळी सर्व नेते भावूक झाल्याचे दिसून आले.

बारामती ही विकासाची पंढरी – अदिती तटकरे

यावेळी बोलताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे अत्यंत भावूक झाल्या. “जशी आपण आषाढी एकादशीला वारीला जातो, तशी कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी बारामती ही ‘विकासाची पंढरी’ आहे,” अशा शब्दांत त्यांनी बारामतीच्या विकासकामांचा गौरव केला.

अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, “अजितदादा जेव्हा जेव्हा निवडणुकीला सामोरे जायचे, तेव्हा ते इथे मारुतीरायाचे दर्शन घ्यायचे. २४ फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणुकीची शेवटची सभाही दादांनी याच ठिकाणी घेतली होती. दादांनी या भूमीत केवळ स्वप्न पाहिली नाहीत, तर ती सत्यात उतरवली. त्यांनी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते तयार केले. दादा ही केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार आहे.”

सुनेत्रा वहिनींनी दादांचे स्वप्न पूर्ण करावे

भाषणादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचे कौतुक करताना अदिती तटकरे यांचे डोळे पाणावले. “दादांनंतर सर्व काही बाजूला ठेवून सुनेत्रा वहिनी खंबीरपणे उभ्या राहिल्या, हे बारामतीकर कधीही विसरणार नाहीत. दादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले, आम्ही त्यांना त्या खुर्चीवर पाहिले आहे. पण आता भविष्यकाळात सुनेत्रा वहिनींनी दादांचे ‘मुख्यमंत्री’ पदाचे स्वप्न पूर्ण करावे,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच बारामतीच्या लाडक्या बहिणी सुनेत्रा वहिनींना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विविध संघटनांचा आणि शिवसंग्रामचा पाठिंबा

यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला. “शिवसंग्राम पक्ष वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रचाराची जी जबाबदारी दिली जाईल, ती आम्ही निष्ठेने पार पाडू,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच अनेक स्थानिक संघटनांनीही सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

अजितदादांनी बारामतीसाठी पाहिलेली अपूर्ण स्वप्ने आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी सोडला.

“दादांच्या कामाची पावती द्या, बारामतीचा आवाज दिल्लीत घुमवा!”- दत्तात्रय भरणे

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा शुभारंभ करताना व्यासपीठावरील वातावरण अत्यंत भावूक झाले होते. अजितदादांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच मोठी सभा असल्याने, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. दत्तात्रय भरणेंनी अजितदादांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, “दादांविना ही सभा होईल असे कधीच वाटले नव्हते. संकट अंगावर घेणारा आणि कामाचा धडाका लावणारा नेता आज आपल्यात नाही, याची सर्वांनाच जाणीव होत आहे. बारामतीत लावलेल्या प्रत्येक झाडापासून ते मोठ्या प्रकल्पांपर्यंत दादांनी प्रत्येकाची काळजी घेतली. आजही काम करताना कधीतरी दादा येतील, असा भास सर्वांना होतो आहे.”

लाडक्या बहिणींचा भाऊ आणि शेतकरी नेता

अजितदादांनी राज्यासाठी आणि बारामतीसाठी केलेले काम अतुलनीय आहे. “लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून त्यांनी आणलेल्या योजना आणि शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस केलेले काम बारामतीकर कधीही विसरणार नाहीत. पूर्वीची बारामती आणि आताची बारामती यातला बदल हा केवळ दादांमुळेच शक्य झाला आहे,” असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. सुनेत्रा पवार यांनी राज्याचे किंवा पक्षाचे प्रमुख पद स्वीकारण्यास सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, दादांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. “वहिनी, तुमच्याकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. दादांचे विचार, त्यांचे आचार आणि कामाची शैली आज तुमच्यामध्ये दिसत आहे,” असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

मतदारांना आवाहन करताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “आता मतदान असे करा की तुमचा आवाज केवळ मुंबईत नाही, तर थेट दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. कार्यकर्त्यांनी छोटे-मोठे मतभेद बाजूला ठेवावेत. कोण पार्थ दादांच्या जवळचे आहे आणि कोण जय दादांच्या, असे विचार मनात आणू नका. आपण सर्वजण पवार कुटुंबाचे देणे लागतो. आपल्या कुटुंबाला लोक विसरले नाहीत, हे मतदानातून सिद्ध करा. मी शेजारचा आहे, पण मला माहिती आहे की एक एक मत महत्त्वाचे आहे. वॉर्डनिहाय मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करा. दादांनी महिला आणि शेतकऱ्यांसाठी जे कार्य केले, त्याची पावती म्हणून सुनेत्रा वहिनींना विक्रमी मतांनी विजयी करा,” असे आवाहन यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केले.

Sunil Shelke: निवडणूक रद्द व्हायला हवी होती…

सुनेत्रा पवार यांच्या प्रचार प्रारंभाच्या सभेत मावळचे आमदार सुनील शेळके यांना आपल्या भावना अनावर झाल्या. ज्या नेत्याने आयुष्याची ३५-४० वर्षे राज्याच्या आणि बारामतीच्या विकासासाठी दिली, त्यांच्या जाण्याने आज पुणे जिल्हा पोरका झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाषण करताना सुनील शेळके अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले की, “ज्या नेत्याने आपल्याला उभे केले, त्या नेत्याच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक होत आहे, ही वेळ येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर ही निवडणूक रद्दच व्हायला हवी होती. ज्यांनी या निवडणुकीत उमेदवार दिले नाहीत, त्यांचे मी आभार मानतो. पण जे ही निवडणूक लढवत आहेत, त्यांना आता कळेल की दादा काय होते आणि ‘दादांचा वादा’ काय होता! सत्ताधारी असो वा विरोधक, या निवडणुकीच्या निकालातून त्यांना दादांची ताकद समजेल.”

अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींवर अनेक टीका झाल्या, असे नमूद करत शेळके म्हणाले, “दादांनंतर पक्षाची आणि कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी वहिनी पुढे आल्या. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पक्षपद स्वीकारले. दादानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये आपल्याला चांगले यश मिळाले, हा दादांच्या विचारांचाच विजय आहे.” कार्यकर्त्यांना आवाहन करताना शेळके म्हणाले, “नुसते दादांचे फोटो लावून चालणार नाही, तर त्यांचे खरे वारसदार आपण आहोत हे मतदानातून सिद्ध करावे लागेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जसे आपण सर्व उमेदवार निवडून आणले, तशीच ताकद आताही दाखवावी लागेल. यावेळी कोणतीही चूक करू नका, समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे.”

“ज्या नेत्याने जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून केवळ विकासाचा ध्यास घेतला, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे. दादांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांच्यासाठी प्रचार करावा लागणे हे देखील आमचे दुर्दैव आहे. आमचे भवितव्य आता बारामतीकरांच्या हातात आहे,” अशा शब्दांत त्यांनी मतदारांना साकडं घातलं.

Sana Malik: जेव्हा मी भाषणासाठी उभी राहते, तेव्हा दादांची आठवण…..

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सना मलिक यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक भाषण केले. “जेव्हा जेव्हा मी भाषणासाठी उभी राहते, तेव्हा दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजितदादांच्या निधनाचा धक्का किती मोठा होता, हे सांगताना सना मलिक म्हणाल्या, “दादांच्या निधनानंतर आम्ही जणू रोबोटसारखे झालो होतो. माझं आणि दादांचं नातं खूप जवळचं होतं. त्यांच्या निधनानंतर मी दोन दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. आम्ही आमचा नेता, आमदार आणि उपमुख्यमंत्री गमवला, पण सर्वात मोठं दुःख सुनेत्रा वहिनींचं आहे. त्यांनी त्यांचा जोडीदार गमावला, हे कौटुंबिक दुःख शब्दांच्या पलीकडचे आहे.”

“सुनेत्रा वहिनींनी अशा कठीण परिस्थितीतही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि दादांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जबाबदारी स्वीकारली, हे कौतुकास्पद आहे. मी एक महिला म्हणून वहिनींच्या दुःखाची जाणीव ठेवते. आज दादा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांनी पाहिलेली स्वप्ने संपलेली नाहीत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे,” असेही त्या म्हणाल्या. अजितदादांनी नेहमीच शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे काम केले. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला कशी मदत केली, याचे अनेक दाखले आज समोर येत आहेत. बारामतीचे पालक म्हणून त्यांनी जो विकास घडवला, तो पाहण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत. दादा गेल्यानंतर बारामती पाहण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सना मलिक यांनी यावेळी जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनी यांच्यासोबत आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. “दादांचे कार्य आणि त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी वहिनींच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास त्यांनी या सभेत दिला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Live News : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले…

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम