Maharashtra Weather Updates Rain Marathi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात (Maharashtra Rain News) होणार आहे. आज पुणे, सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर, धाराशिवमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 20 जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. जुलैच्या सुरुवातीला मुंबई, कोकण, पुणे आणि घाटमाथा परिसरात चांगला पाऊस झाला. मात्र, उर्वरित महाराष्ट्र अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोच्या परिणामाचाही प्रभाव जाणवत असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather Updates)
रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी- (Raigad Rain News)
रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. रायगडमधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. रायगड जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर उघडीप झाली होती. अखेर आज उत्तर रायगडसह दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.

औंढा नागनाथ तालुक्यात जोरदार पाऊस- (Hingoli Rain News)
मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पेरणी झालेल्या शेतातील पिके सुकू लागली होती. त्यानंतर काल सायंकाळच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. तर अशाच पद्धतीने जोरदार पावसाने बरसावे असे अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
बीडच्या केज शहरासह अनेक परिसरात गेल्या पावसाची हजेरी- (Beed Rain News)
बीडच्या केज शहरासह अनेक परिसरात गेल्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने केज शहरातील रस्ते जलमय झाले आहेत तर काही ठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी साचले आहे.या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी बीड जिल्ह्यात अद्यापही मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेत.
परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाची हजेरी, अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर पाऊस- (Parbhani Rain News)
परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरासह परिसरात अखेर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस तुरळक आणि कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काल दुपारनंतर ढग दाटून आले आणि काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, वातावरण प्रसन्न झाले आणि नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला. मात्र शेतीच्या दृष्टीने हा पाऊस अद्याप अपुरा असल्याचे चित्र आहे.













