Vande Mataram Guidelines: केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’बद्दल नवे निर्देश जाहीर केले आहेत. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत वाजवणे अनिवार्य असणार आहे. राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे राहावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. याचाच भाग म्हणून नवी नियमावली जाहीर केली असावी, असे सांगितले जाते.

नव्या निर्देशानुसार, आता सहा कडवी असलेल्या वंदे मातरमचे ३ मिनिट १० सेकंदाचे गायन करावे लागणार आहे. यापूर्वी वंदे मातरमची दोन कडवी गायली जात होती, ज्यासाठी ६५ सेकंदाचा वेळ लागत होता. झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत वाजवले जाणार आहे.

माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवायचे असल्यास राष्ट्रगीत जन गण मन आधी राष्ट्रीय गीत वंदे मातरम वाजवले जाईल. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संवैधानिक संस्थांना यासंबंधीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.