Mumbai News: मुंबईत आज शिवसेनेचे नेते गट नोंदणी करण्यासाठी पालिका मुख्यालयात एकत्र येणार. शिवसेनेच्या गट नेते पदी तरुण आणि अभ्यासू अशी ओळख असलेल्या अमेय घोले यांच्या नावाची चर्चा
BMC Election 2026 Shivsena: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आता जवळ येऊन ठेपल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील 29 नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाणार आहे. तत्पूर्वी शिंदे गटाकडून मुंबई महानगरपालिकेतील गटनेते पदासाठी अमेय घोले (Amey Ghole) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेतील तरुण आणि अभ्यासू नगरसेवक अशी अमेय घोले यांची ओळख आहे. गेल्या तीन टर्मपासून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना महानगरपालिकेतील कामकाजाचा चांगला अनुभव आहे. याशिवाय, अमेय घोले हे एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. यामुळेच शिवसेनेच्या गटनेतेपदासाठी अमेय घोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
अमेय घोले यांना मुंबई महानगरपालिकेतील राजकारणाचा चांगला अनुभव आहे. तीन टर्म नगरसेवक राहिल्याने अमेय घोले यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्यावर गटनेते पदाची जबाबदारी दिल्याचे बोलले जाते. सोमवारी सकाळी 10 वाजता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसेचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात जमतील. येथून हे सर्वजण कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी रवाना होतील. मुंबई महानगरपालिकेत पहिली अडीच वर्षे महापौरपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, भाजपने शिवसेनेच्या या दबावतंत्राला काडीची किंमत न देता तडजोड न करण्याची भूमिका घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नमते घेतले. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक स्वतंत्रपणे गट नोंदणीसाठी जाणार होते. या नगरसेवकांना घेण्यासाठी बसही आली होती. मात्र, ही बस रिकामी माघारी परतली होती. यानंतर आज शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्रच कोकण भवनात जाणार आहेत.
संबंधित बातम्या
Mumbai News: फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, मुंबई महानगरपालिकेत काय केलं?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे स्थायी समितीत भाजप पाठोपाठ ठाकरे गटाचे जास्त सदस्य असणार होते. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांच्या सदस्यांची संख्या समान होणार होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यावर एक तोडगा काढून महायुतीची ताकद वाढवली आहे. आज कोकण भवनात भाजपच्या 89 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी होईल. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी होईल. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांचा आकडा 121 इतका झाला आहे. यापूर्वी स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान होताना दिसत होते. मात्र, आता महायुतीचे दोन गट स्थापन झाल्याने सत्ताधाऱ्यांचे स्थायी समितीमधील संख्याबळ एकने वाढणार आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.



