सांगोला तालुक्यात चक्क … २३ लाख किंमतीचे सोने जप्त
अडखळत उत्तरे दिल्याने तरुण ताब्यात
सांगोला : सराफ दुकानदारास चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून सुमारे २३ लाख रुपये किमतीचे ४२६ ग्रॅम १८ कॅरेट सोने जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवार, दि. १७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथे करण्यात आली.
याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल अस्लम काझी यांनी अतुल धोत्रे (वय २६, रा. गार्डी, ता.पंढरपूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अस्लम काझी हे मंगळवार, दि. १७ रोजी महूद दूरक्षेत्र हद्दीतील दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना दुपारी दोनच्या सुमारास बातमीदारामार्फत एक संशयित हा महूद येथील एका सराफामध्ये चोरीचे सोने विक्री करता आल्याचे माहिती मिळाली. त्या आधारे पोलिस हेड कॉन्स्टेबल अस्लम काझी व पोलिस हेडकॉन्स्टेबल बोराडे असे मिळून ज्वेलर्सच्या ठिकाणी गेले आणि ज्वेलर्समधून बाहेर येत असलेल्या एकजणाकडे बोट दाखवल्याने पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन आपण पोलिस असल्याची ओळख सांगताच पोलिसांना पाहून तो भांबावून गेला.
पोलिसांनी त्याला नाव, गाव पत्ता विचारला असता त्याने अडगळत सांगू लागल्याने व तो त्याच्या खिशावर हात दाबू लागल्याने पोलिसांना त्याचा संशय आला म्हणून त्यास महूद येथील दूरक्षेत्र कार्यालयात नेऊन चौकशी केली असता त्याच्या अंगझडतीमध्ये पॅन्टच्या खिशात १०० रुपयांच्या ४ नोटांसह अंदाजे ४०० ग्रॅम वजनाचे पिवळे धातूची लगड मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
तरुणाकडे पावत्या आढळल्या नाहीत
पोलिसांनी तरुणाला पिवळ्या धातूची लगड कोठून चोरली आहे का किंवा कोणाची आणली आहे का, ती विकण्यासाठी आला होतास का ? याबाबत विचारले असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही अगर मालकी हक्काच्या पावत्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे पावत्या नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.