sportstop news

Ind vs Aus 3rd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! गाबा कसोटी सोडून स्टार खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल, मैदानात नेमकं काय घडलं?

Josh Hazlewood Injury : ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया वरचढ दिसत आहे. सामन्याचा चौथा दिवस सुरू असून फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडिया झगडत आहे. दरम्यान, कांगारूंना मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड सामन्याच्या चौथ्या दिवशी मैदान सोडून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

मैदानात नेमकं काय घडलं?

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला, जेव्हा 33 वर्षीय जोश हेझलवूड चौथ्या दिवशी फक्त एकच षटक टाकू शकला. त्याच्या पायाला सूज आल्याने त्याने मैदान सोडले आणि आता त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग केले जाणार आहे. यासाठी तो रुग्णालयात गेला आहे. सामन्यात ते पुढे सहभागी होऊ शकतील की नाही हे स्कॅननंतर कळेल.

असं असलं तरी चौथ्या दिवशी जोश हेझलवूड उपलब्ध होणार नाही. आता या कसोटीत तो गोलंदाजी करताना दिसणार का? हा एक प्रश्न आहे. जर त्याला गंभीर दुखापत झाली असेल, तर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचे महत्त्व लक्षात घेऊन जोश हेझलवूडला या सामन्यातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, हे स्कॅन केल्यानंतरच कळेल. खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली आहे. जोश हेजलवूडने या सामन्यात 6 षटके टाकली असून एक विकेट त्याच्या नावावर आहे. त्याने विराट कोहलीला ॲलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले.

दुखापतीमुळे जोश हेझलवूड ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्याचा भाग नव्हता. त्याच्या जागी स्कॉट बोलंडला संधी देण्यात आली होती. त्याने चांगली गोलंदाजी केली. असे असूनही जोश हेझलवूडने पुनरागमन केले आणि आता तो जखमी झाला आहे. पर्थ कसोटी सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली होती. जोश हेझलवूड उपलब्ध नसल्यास पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर अधिक गोलंदाजी करण्याचे दडपण असेल. याशिवाय नॅथन लियॉन आणि मिचेल मार्श यांनाही गोलंदाजी करावी लागेल. मार्शने ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये फारशी गोलंदाजी केलेली नाही.

Related Articles

Back to top button