‘लाडका भाऊ’ शिंदेंकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपद नाही; भाजप, NCP कडून किती लाडक्या बहिणी?
वाशिम: विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेची चांगलीच चर्चा रंगली होती. तर लाडक्या बहिंनिमुळे राज्यात महायुतीला भक्कम यश मिळाल्याचे अनेक नेत्यांकडून बोलले गेले. या निवडणुकीत बऱ्याच लाडक्या बहिणी आमदार सुद्धा झाल्यात. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीने काही लाडक्या बहिणींना मंत्री केलं आहे मात्र शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी एकाही लाडक्या बहिणीला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून एकनाथ शिंदे यांना लाडकी बहीण आता पोरकी झाली का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी आज उपराजधानी नागपुरात पार पडला यात भाजपने 3 आणि राष्ट्रवादीने एका महिला आमदाराला मंत्री पदाची शपथ दिली मात्र एकनाथ शिंदे यांनी एकाही महिला आमदाराला मंत्री पद न दिल्याने त्यांना बहिण फक्त निवडणुकी पुरतीच लाडकी होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंजुळा गावित साक्री विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या आहेत तर संजना जाधव कन्नड विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या आहेत. त्याच बरोबर नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि भावना गवळी ह्या विधान परिषद सदस्य आहेत. शिंदे सेने कडे पाच महिला आमदार असताना सुद्धा एकाही महिला आमदाराला मंत्री पद दिलं नाही. फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळ विस्तारात आज एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली यात 4 महिला आमदारांनी शपथ घेतली भाजपने पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांना मंत्री केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून आदिती तटकरे यांना अजित पवार यांनी मंत्री केलं. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्री पद दिलं नाही.
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे ह्या विधान परिषदेच्या सभापती आहेत. त्यांच्या नंतर भावना गवली ह्या शिवसेनेत ज्येष्ठ महिला नेत्या आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात त्या पाच वेळा खासदार राहिल्या आहेत. तर विद्यमान विधानपरिषद सदस्य आहेत. भावना गवळी यांचा राजकीय अनुभव आणि विदर्भात असलेली संघटनात्मक पकड पाहता त्यांना मंत्री करतील अस त्यांच्या समर्थकांना वाटत होत मात्र एकनाथ शिंदे यांनी एकाही महिला आमदाराला मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे लाडकी बहीण फक्त विधानसभा निवडणुकीपुरतीच होती का ? निवडणूक झाली की लाडकी बहीण पोरकी झाली का असा प्रश्न जनमानसाला पडला आहे