लाडक्या बहिणींना गुडन्यूज, डिसेंबरच्या हप्त्याची तारीख अखेर समोर, या दिवसी खात्यात जमा होणार पैसे
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली. जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात. जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हफता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला होता. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते.
त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली. मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुले किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाणणी बाकी होती, त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे. त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत.