political
जामीन स्थगितीची ईडीची मागणी नाकारली, राऊतांची आजच सुटका
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. संजय राऊतांच्या जामीनावर स्थगिती देण्याची ईडीची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राऊत केव्हाही तुरुंगाबाहेर येऊ शकतील.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली होती.
तेव्हापासून राऊत तुरुंगात आहेत. अटक केल्यानंतर राऊत यांना सुरुवातीला ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अटकेनंतर राऊत आर्थर रोड कारागृहामध्ये होते. या प्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही, असा युक्तीवाद राऊतांचे वकिलांनी केला.
परंतु, ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला. या जामीनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावल्याने राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.