आमदार राजू खरे यांच्या त्या जाहिरातीची एकच चर्चा; आषाढीचा उपवास कोणत्या पक्षात सोडणार?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Mohol MLA Raju Khare : पश्चिम महाराष्ट्रात शिंदे सेना अजून एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या एका जाहिरातीने या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. काय आहे हे प्रकरण?

एकनाथ शिंदे गटाने गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. इतर पक्षातील एक एक शिलेदार गळाला लावण्याचा एकसूत्री कार्यक्रम शिंदे सेनेने हाती घेतला आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जाहिरात केली आहे. त्यांच्या या जाहिरातीने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. शिंदे सेनेने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरात भक्कम फळी उभारली आहे. खासदार, आमदार, कार्यकर्ते शिंदे गटात आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता आमदार राजू खरे आषाढीचा उपवास कोणत्या पक्षात सोडतात याची कुजबुज सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जाहिरात

”आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडूरंगाच्या पंढरीत वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी दौऱ्यानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंढरी नगरीत सहर्ष स्वागत’ अशा आशयाची जाहिरात आमदार राजू खरे यांनी दिली आहे. या जाहिरातीची सध्या जिल्ह्या चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांच्याकडून वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. या पूर्वीही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त अशी जाहीरात दिली होती. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आमदार राजू खरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सोलापूरात मोठे खिंडार पाडणार

सोलापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी जूनच्या अखेरीस शिंदे सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि सोलापूरातील काँग्रेस नेते प्रा. अशोक निम्बर्गी हे उपस्थित असल्याने आता सोलापूरात शिंदे सेना किती पक्षाला सुरूंग लावते याची चर्चा सुरू आहे. त्याची झलक लवकरच दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon