Satej Patil on Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सध्या राजकारण रंगले आहे. सतेज पाटील हे 9 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत.
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सध्या महाराष्ट्रात मोठे राजकारण रंगले आहे. यंदा गोकुळची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. गोकुळच्या एकूण 25 जागांपैकी 12 जागांव महायुती आणि 13 जागांवर सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील समविचारी पॅनलचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेला 14 चा कोरम पूर्ण करता न आल्याने अद्याप ती निवड होऊ शकलेली नाही. हीच संधी साधून महायुती सरकारने सहकार कायद्यात मोठे बदल करुन गोकुळवर पाच शासकीय संचालकांची नियुक्ती करण्याचा अध्यादेश काढला होता. यापैकी चार शासकीय संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत जास्त जागा मिळवूनही समविचारी पॅनेलला सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. यावरुन सध्या प्रचंड राजकारण रंगले आहे. (Maharashtra Politics news)

महायुती आणि समविचारी पॅनेलने कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आपल्या 12 संचालकांना सहलीला पाठवले आहे. महायुतीचे 12 संचालक हे अलिबागमध्ये असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सतेज पाटील हे कोल्हापूरमध्ये बसून महायुतीच्या प्रत्येक हालचालीवर इतक्या बारकाईने लक्ष ठेऊन आहेत की, हे संचालक कुठे आहेत, याची सगळी माहिती सतेज पाटील यांना आहे. सतेज पाटील यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत रंजक माहिती सांगितली. सतेज पाटील यांनी सांगितले की, महायुतीचे 12 संचालक गोवा, सुरत असा प्रवास करुन आता उदयपूरला पोहोचले आहेत. ते अलिबागला गेले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आली. मात्र, हे 12 जण उदयपूरला मॅरिएट हॉटेलमध्ये आहेत. मला या सगळ्यांचे रुम नंबरही माहिती आहेत. हे सगळे पहिल्या मजल्यावर आहेत. 130 पासून त्यांचे रुम नंबर सुरु होतात. या सगळ्यांकडून एका प्रतिज्ञापत्रावरही सह्या घेतल्या जात आहेत. त्यामध्ये काय लिहले आहे, याची त्यांनाही कल्पना नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
या मुलाखतीत सतेज पाटील यांनी आपल्याला सत्ताधारी पक्षातील काही लोक माहिती देत असल्याचे सांगितले. सत्ताधारी महायुतीमधील अनेकांना गोकुळवर सरकारी संचालक नेमण्याची गोष्ट आवडलेली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडते, हेदेखील मला ठाऊक आहे. मी सत्तेत नाही, मंत्री नाही, तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोकुळबाबत घडणाऱ्या चर्चेबाबत मला माहिती मिळते. मी गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात आहे. माझे सगळ्याच पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. आम्ही सत्तेत असताना मीदेखील अनेकांची कामं केली आहेत, असे सतेज पाटील यांनी म्हटले.






