मुंबईतील शिवाजी पार्क येथे २ ऑक्टोबर रोजी CJPच्या आंदोलनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. आंदोलन पाहण्यासाठी आलेल्या ७५ वर्षीय गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील दोस्ती वेस्ट काउंटी परिसरात राहणारे गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई हे सायंकाळी सुमारे ४.३० वाजता शिवाजी पार्क येथे आले होते. सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली.
यानंतर त्यांच्या मित्रांनी आणि आंदोलनस्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना मदत केली. घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शिवाजी पार्क येथील सुश्रुषा रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, कुटुंबीयांच्या संमतीनंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
CJPकडून शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
या आंदोलनादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.







