क्रिकेट सामन्यात खेळपट्टीवर धाव घेताना तारांबळ उडाल्यामुळे एखादा फलंदाज बाद होतो. यादरम्यानचा क्षण अगदी पाहण्यासारखा असतो. यामुळे खेळाडूंमध्ये अनेकदा खटकेही उडतात. तसेच, ते एकमेकांना मैदानावरच व्यक्त होतात. असेच काहीसे भारत विरुद्ध बांगलादेश संघात ऍडलेड मैदानावर झालेल्या सामन्यात घडले.
ही घटना विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्यात घडली. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या डावात नाबाद 64 धावांची खेळी साकारली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर केएल राहुल याने विराटसोबत डाव सांभाळला. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी साकारली. यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 38 आणि हार्दिक पंड्यासोबत 14 धावांची भागीदारी रचली. हार्दिकनंतर क्रीझवर उतरलेला कार्तिक
लयीत दिसत होता. मात्र, तो 17व्या षटकात धावबाद झाला. कार्तिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये विराट आणि कार्तिकमध्ये चुकीच्या कॉलमुळे बाचाबाची झाल्याचे दिसते.
17 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉट मारला. मात्र, चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. विराटला फुलटॉस चेंडूवर शॉट मारताना पाहून कार्तिक धाव घेण्यासाठी पळाला. मात्र, विराटने त्याला नकार दिला. यानंतर कार्तिक लगेच मागे वळला, पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. तो धावबाद झाला.