सोलापूर : शहरातील रंगभवन पासून सात रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लाकडी फर्निचर, दुचाकी सर्विसिंग दुरुस्ती तसेच विविध देखाव्यांच्या सजावटीच्या वस्तू असलेल्या दुकानांना सोमवारी दुपारी सव्वातीन च्या सुमारास अचानक आग लागली.
आग एका दुकानाला लागली होती नंतर ती आग पसरत शेजारी असलेल्या सगळ्याच दुकानांमध्ये लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आग विझवण्याचा प्रयत्न झाला मात्र आग मोठी असल्याने शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले.
अचानक लागलेल्या या आगीमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या दुकानदारांनी आपली दुकाने व्यवस्थित बांधली होती परंतु तरीही अचानक दुपारच्या सुमारास आग लागली आणि त्या आगीने चार ते पाच दुकानांना घेरले होते.
या आगीमुळे रंगभवन ते सात रस्ता पूर्ण नागरिकांनी जाम झाला आहे. अग्निशामक दलाच्या तीन वाहनांनी येऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.