औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. भुमरे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील युवराज चवरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
भुमरे यांनी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला व्हॉट्सअपवरून फोन करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवराज या तरुणाने तक्रारीत असा दावा केला आहे की, सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टनंतर भुमरे यांनी व्हॉट्सअपवर कॉल करून धमकी दिली. काहीही कारण नसताना त्यांनी मला धमकी दिली. माझ्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट का केली, म्हणत शिवीगाळ केली. तसेच पाचोड गावात आल्यावर तुला दाखवतो, नाही तर तुझ्या घरी पोर पाठवून मारायला लावतो, अशी धमकी त्यांनी दिली आहे.