श्रद्धा हत्या प्रकरणात अफताब पुनावाला याने जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अफताब सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
अफताब याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची अफताबने मे महिन्यात हत्या केली होती. मात्र, या हत्येच्या सहा महिन्यांनंतर याचा खुलासा झाला. हत्येनंतर अफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने जवळच्याच महरौली जंगलात फेकले. श्रद्धाचा कोणाशीच संपर्क होत नसल्याने तिच्या मुंबईतील मित्रांनी तिची चौकशी सुरू केली.
तेव्हा तिची हत्या झाल्याचं लक्षात आलं. तेव्हापासून हे प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत असतानाच अफताबने आता जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. मात्र, त्याला जामीन मिळू नये अशी संबंध देशवासीयांची मागणी आहे. तो जामिनावर सुटून बाहेर आला तर या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.