ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकात आज इंग्लंड विरुद्ध श्रीलंका हा महत्त्वाचा सामना खेळला गेला. अ गटातील या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीचे भविष्य अवलंबून होते.
इंग्लंडने शानदार सांघिक कामगिरी करत श्रीलंकेला पराभूत करत उपांत्य फेरीत आपली जागा बनवली. इंग्लंडच्या विजयाने यजमान व गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिद सामन्याचा मानकरी ठरला.
अ गटातील अखेरच्या सामन्यात उतरण्यापूर्वी श्रीलंका संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. मात्र, त्यांनी इंग्लंडचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी जाण्याची संधी मिळणार होती.
सिडनी येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निसंका व कुसल मेंडीस यांनी 4 षटकात 39 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर इतर फलंदाज पूर्णतः अपयशी ठरले. युवा निसंकाने संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करताना 67 धावांची खेळी केली.
राजपक्षेने 22 धावांचे योगदान दिले. मार्क वूडने अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत श्रीलंकेला 141 धावांपर्यंत रोखण्यात यश मिळवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघासाठी कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी 75 धावांची भागीदारी केली.
हेल्सने 47 व बटलरने 28 धावांच्या खेळ्या केल्या. त्यानंतर इंग्लंडचे लागोपाठ बळी गेले. मात्र, संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्स अखेरपर्यंत मैदानावर उभा राहिला. त्याने 44 धावांची नाबाद खेळी केली. दोन चेंडू राखत इंग्लंडने विजय मिळवत उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली.