चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ काढली जात आहे.वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राहुल यांना विनंती केली.मात्र, या विनंतीनंतर राहुल यांनी ‘भारत जोडो यात्रा’ आणि कोरोना या बाबत सरकार बहाणे करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली.
भारत जोडो यात्रे’साठी राहुल गांधी गुरुवारी हरियाणातील नूह येथे होते. त्यावेळी राहुल गांधींनी आरोग्य मंत्रालयाच्या पत्राचा समाचार घेतला.
यावेळी राहुल म्हणाले की, भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी भाजपने मला पत्र लिहिले आहे. यामध्ये ते म्हणाले, कोरोना वाढतोय. तुम्ही भारत जोडो यात्रा थांबवा, मास्क घाला असे सांगत आहेत, पण आपली भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारीपर्यंत जाणारच. आता आपल्या यात्रेला १०० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे यात्रा थांबवण्यासाठी ते बहाणे करत आहेत.