खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. माझ्या वडिलांना कोणी मारलं, हे मला माहीत आहे. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता, हे तत्कालीन सरकार शोधून शकले नाही, अशी टीका पूनम यांनी केली आहे. त्यावेळी काँग्रेस -राष्ट्र्रवादी काँग्रेस सत्तेत होती. तेव्हा तुम्ही हा मास्टरमाइंड का शोधला नाही? असा सवालही पूनम यांनी उपस्थित केला. राजकारणातले शकूनी कोण हे ही जनतेला माहित आहे, असेही पूनम म्हणाल्या.
भाजप नेते प्रमोद महाजन यांची त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी त्यांच्या राहत्या घरी २००५ साली हत्या केली होती. त्यानंतर आरोपी प्रवीण यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती. प्रवीण यांचा नंतर ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला होता. आता पुन्हा प्रमोद महाजनांच्या खुनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूनम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून टीका केली होती. तेव्हा अजित पवार यांनी पूनम यांच्यावर टीका करत तुझ्या चुलत्याने तुझ्या बापाला का मारले, दोघेही एकाच आईचे पुत्र होते, तरी एका भावाने दुसर्या भावाला का मारले, असा सवाल केला होता.