दिल्लीतील महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी शहरातील तिन्ही महापालिकांचं विलिनीकरण करण्यात आल्यानंतर ही निवडणूक भाजप आणि आपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. परंतु दिल्लीतील पायाभूत सुविधांच्या कामांचा दावा करत आपनं दिल्लीतील महापालिकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
दिल्ली महापालिका निवडणुकीत आतापर्यंत २५० पैकी २३० जागांवरील निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी आम आदमी पार्टीनं १२६ आणि भाजपनं ९७ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळं आपनं महापालिकेतील बहुमताचा आकडा पार केला असून आणखी २० जागांचे निकाल बाकी असल्यानं आपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पालिकेतील जागा झपाट्यानं कमी झाल्या आहेत. त्यामुळं आता मोदी-शहांच्या रणनीतीला भेदत केजरीवालांनी दिल्लीतील विधानसभेनंतर महापालिकाही काबीज केल्यानं हे आपसाठी मोठं यश मानलं जात आहे.