आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे कायमच चर्चेत असतात. मुंढे आणि वाद जणू काही आता समीकरणच झालं आहे. मुंढे यांची पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्य खात्यातून बदली करण्यात आली असून, त्यांना कोणत्याही नव्या पदावर अद्याप नियुक्त केलेले नाही. तीन महिन्यांपूर्वीच म्हणजेच सप्टेंबर 2022 च्या अखेरीस तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा आणि कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानपदाचा कार्यभार स्वीकारला होता, त्यानंतर त्यांनी राज्यात दौरे करून आरोग्य खात्याची झाडाझडती घेतली होती. त्यामुळे ते सावंत यांच्याही रडारवर आले होते.
मुंढेंनी आरोग्य खात्याचा कार्यभार खांद्यावर घेतल्यानंतर मराठवाड्याचा दौरासुद्धा केला होता. मराठवाड्याच्या दौऱ्यात रुग्णालयाची पाहणी करताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनाही निलंबित करण्याचा त्यांनी दम भरला होता.
तसेच सरकारी रुग्णालयांत येणाऱ्या तपासण्यांचे रिपोर्ट खासगी लॅबमध्ये न करण्याची तंबीसुद्धा त्यांनी संबंधित डॉक्टरांना दिली होती. आरोग्य खात्यातही धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केल्यानंतरच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.