शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. उद्धव ठाकरेंनी नेत्यांना पुरेसा वेळ न दिल्याने ४०आमदारांनी शिवसेना सोडली, असा आरोप करण्यात आला होता. यावर आदित्य ठाकरेंनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेतील फूट उद्धव ठाकरे आणि माझ्यामुळेच पडली, असा धक्कादायक खुलासा आदित्य यांनी केला आहे. इंडिया टुडेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आमच्यामुळेच शिवसेना फुटली. बंडखोरांवर आम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला. ते आमच्यातीलच आहेत असं आम्हाला वाटत होतं. ते आमच्यासोबत कायम एकनिष्ठ राहतील असं आम्हाला वाटलं होतं. गेल्या ४०-५० वर्षात कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं दुसऱ्या नेत्याला दिलं नव्हतं. पण आम्ही दिलं, अशी खंत आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली.
आम्हाला वाटलं आम्ही त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो. पण ते आमच्या मागे असा खेळ करतील असं वाटलं नव्हतं. आम्ही आमच्या नेत्यांवर पाळत ठेवत नव्हतो. आणि इथंच आमचं चुकलं. राजकारण वाईट आहे, असं आम्हाला वाटत नव्हतं. आमचा याच विश्वासामुळे आमचा विश्वासघात झाला, असेही आदित्य म्हणाले.