राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मोठा दणका बसणार आहे. मलिक यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. ईडीला तशी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ईडीकडून होणारी ही कारवाई मलिकांसाठी धक्का असणार आहे. या कारवाईत ईडी नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यात ईडी मुंबईत असलेल्या गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिममधील दोन फ्लॅट, उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमीन अशा संपत्तीवर टाच आणेल. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकर संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली.
या कारवाईत मलिकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात ईडीनं मलिक कुटुंबाची तात्पुरत्या स्वरूपात मालमत्ता जप्त केली.
आता समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीनं केलेल्या जप्तीला अधिनिर्णय प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत.