ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा टिपिकल उर्मटपणा सगळ्यांना माहितीच आहे. क्रिकेट मैदानात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंग करून प्रतिस्पर्धी टीमचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे टीम ऑस्ट्रेलिया आधीच बदनाम आहेत.
पण आता त्या पुढे जाऊन ऑस्ट्रेलियातले वर्ल्ड कप आयोजित करणारे यजमान देखील तितकेच उर्मट आहेत हे स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात अतिशय खराब वागणूक मिळाली आहे. टीम इंडियाचे प्रॅक्टिस सेशन त्यांना उतरवण्यात आलेल्या हॉटेलपासून 42 किलोमीटर लांब ठेवले.
टीम इंडियाचे प्रॅक्टिस सेशन सिडनीमधील हॉटेलपासून पासून 42 किलोमीटर दूर ब्लॅक टाऊनमध्ये ठेवले होते, इतकेच नाहीतर प्रॅक्टिस सेशननंतर खेळाडूंना खाण्यासाठी फक्त सँडविच देण्यात आले. त्यांना दिलेले बाकीचे अन्नपदार्थ देखील थंड आणि खराब होते. अतिथी देवो भव म्हणून पाहुण्यांची सरबराई करणे तर दूरच पण गरम अन्नपदार्थ वाढण्याचे साधे सौजन्य देखील ऑस्ट्रेलियन क्रिकेट व्यवस्थापनाने दाखवले नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे, इतकेच नाही तर या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात मिळालेल्या खराब वर्तणुकीबद्दल आयसीसीकडे तक्रार देखील केली आहे.