अभिनेता अजय देवगण याच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, विजय साळगावकरच्या कथेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी सगळे चाहते आतुर झाले होते. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.अजयचा हा चित्रपट बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडेल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती.
दुसरीकडे बुकिंगचे आकडे देखील हा चित्रपट पहिल्याच दिवशी १२ कोटींची कमाई करेल, असे म्हणत होते. मात्र, चित्रपटाने हा आकडा देखील पार केला आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम २’ने १५.३८ कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
- या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता ‘दृश्यम २’ देखील प्रेक्षकांमध्ये सुपरहिट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५० कोटींच्या बजेटमध्ये ‘दृश्यम २’ तयार करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशीचे आकडे बघून मेकर्स देखील खूश झाले आहेत, आता या वीकेंडला चित्रपटाकडून जास्त कमाईची अपेक्षा केली जात आहे.