Vidhanparishad Election 2026: महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक येत्या 12 मे रोजी होणार आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक सहा जागा येणार आहेत. अजित पवार गटाकडे एकच जागा.
Vidhanparishad Election 2026: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे सर्व लक्ष आगामी विधानपरिषद निवडणुकांवर (Vidhanparishad Election 2026) केंद्रित होणार आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. यानंतर लगेच त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) असलेल्या आमदारांच्या संख्याबळानुसार त्यांचा एक आमदार निवडून येऊ शकतो. विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील सध्याचे संख्याबळ 40 असल्यामुळे दुसरी जागा जिंकणे पक्षासाठी कठीण आहे. मात्र, विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते देव पाण्यात बुडवून बसले आहेत. (Maharashtra Politics news)

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी अनेक नेते इच्छूक असल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निर्णय क्षमतेची कसोटी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेवर जाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये राजेंद्र जैन (Rajendra Jain), अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील, विक्रम संजय काकडे यांचा समावेश आहे. माजी आमदार राजेंद्र जैन हे कट्टर प्रफुल पटेल समर्थक आहेत. तर सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यापूर्वीही विधानपरिषदेवर होते. याशिवाय, पुण्यातील पोर्शे कार अपघातात बिल्डर अग्रवालच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप असणारे आणि विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून पराभूत झालेले सुनील टिंगरे हेदेखील विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक आहेत. तर उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असून आनंद परांजपे हेदेखील पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात.















