Jammu Kashmir Udhampur Bus Accident : वर्षभरापूर्वी जे जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यानं हादरलं होतं, त्याच जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरानंतर आणखी एका भीषण घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू ओढावला आहे.
Jammu Kashmir Udhampur Bus Accident : जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागातील खागोटेजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. अपघाताचं स्वरुप पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार सोमवारी हा मोठा अपघात घडला. जिथं प्रवाशांना नेणारी एक बस डोंगरावरून खाली कोसळली आणि या अपघातात प्रवाशांचा मृत्यू ओढावला. ही बस रामनगरहून उधमपूरच्या दिशेनं पुढे जात असताना त्याचवेळी जालो इथं अचानक हा अपघात ओढावला. प्राथमिक स्तरावर अपघाताचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हे बेजबाबदार वाहनचालनामुळं घडलं असावं. कारण, एका वळणावर बसचा टायर फुटला आणि त्यामुळं चालकानं स्टिअरिंगवरील नियंत्रण गमावलं.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील महत्त्वाची पथकं घटनास्थळी दाखल होत तिथं बचावकार्य सुरू करण्यात आलं. दरम्यान या परिस्थितीवर करडी नजर ठेवली जात असतानाच सविस्तर माहिती मात्र प्रतिक्षेत आहे. हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीसुद्धा दु:ख व्यक्त केलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून गिलेल्या माहितीनुसार त्यांनी रामपूरहून उधमपूर इथं जाणाऱ्या प्रवासी बसच्या अपघाताबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना सहानुभूती दिली.
काही महिन्यांपूर्वीच जम्मू काश्मीरमध्येच एक भीषण अपघात घडला, ज्याच्या आठवणी मिटत नाहीत तोच आणखी एक अपघात घडल्यानं इथं रस्ते प्रवास आणि सुरक्षिततेबाबत नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात लष्कराचं वाहन 400 फूट खोल दरीत कोसळलं होतं. यामध्ये 10 जवानांचा मृत्यू ओढावला होता.















