या फुटेजमध्ये रुग्णालयाच्या आत आणि आजूबाजूला झालेले नुकसान दिसत आहे. यापूर्वीही इराणवर अशाच प्रकारच्या हल्ला झाला असून, काही व्हिडिओ समोर आले आहेत.

Iran War Live Update: इराणने रुग्णालयांवरील हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. भारतातील इराणी दूतावासाने हा व्हिडिओ शेअर केला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये रुग्णालयांचे नुकसान झाल्याचे म्हटलं आहे. भयावह हल्ल्यात जीवाच्या आकांताने डाॅक्टर, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक सैरावैरा धावताना दिसून येत आहेत. जीवाच्या आकांताने नवजात बालकांना एक माऊली वाचवताना दिसून येत आहे. या फुटेजमध्ये रुग्णालयाच्या आत आणि आजूबाजूला झालेले नुकसान दिसत आहे. यापूर्वीही इराणवर अशाच प्रकारच्या हल्ला झाला असून, काही व्हिडिओ समोर आले आहेत.
परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळू शकते
दरम्यान, इराणने म्हटले आहे की, त्यांचा अमेरिकेवर विश्वास नाही. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर म्हणाले की, परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळू शकते आणि लष्कर पूर्णपणे तयार आहे. गालिबाफ म्हणाले की, जर इराणी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकत नसतील, तर इतर देशांच्या जहाजांनाही जाऊ दिले जाणार नाही. त्यांनी अमेरिकेने इराणी बंदरांवर घातलेल्या नाकेबंदीला एक चुकीचा आणि बेजबाबदार निर्णय म्हटले. ते म्हणाले की, या कृतीमुळे प्रदेशातील तणाव वाढत आहे. गालिबाफ यांनी इशारा दिला की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरुंग-निवारणासारखी कोणतीही कारवाई शस्त्रसंधीचे उल्लंघन मानली जाईल आणि त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. ते असेही म्हणाले की, इराण चर्चेसाठी तयार आहे, परंतु याचा अर्थ कमजोरी असा घेऊ नये. त्यांनी दावा केला की, अमेरिकेकडे संसाधने आणि शस्त्रे असूनही, ते इराणसमोर सामरिकदृष्ट्या कमकुवत आहे.
अमेरिका इस्रायलच्या हिताचे निर्णय घेते
गालिबाफ यांनी अमेरिकेवर ‘राष्ट्र प्रथम’ असे घोषित करूनही इस्रायलच्या हिताचे निर्णय घेण्याचा आरोप केला आहे. गालिबाफ म्हणाले की, अमेरिका अनेकदा इस्रायलकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे निर्णय घेते. त्यांच्या मते, यामुळेच अमेरिका धोरणात्मक चुका करते आणि परिस्थितीचे अचूक मूल्यांकन करण्यात अपयशी ठरते.
गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
भारतीय जहाजांवर गोळीबार
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केला. 14 जहाजे थांबवण्यात आली, त्यापैकी 13 परत पाठवण्यात आली. भारताने राजदूतांना बोलावून निषेध नोंदवला.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद
अमेरिकेने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत इराणने ही सामुद्रधुनी पुन्हा बंद केली.
अमेरिकेने 26 दशलक्ष बॅरल तेल सोडले
पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने आपल्या आपत्कालीन साठ्यातून २६ दशलक्ष बॅरल तेल काढून कंपन्यांना सोडले.
अमेरिका-इराण चर्चेची पुढील फेरी शक्य
सोमवारी पाकिस्तानात नवीन चर्चा होऊ शकते. दोन्ही बाजूंनी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही.
ट्रम्प म्हणाले, नाकेबंदी सुरूच राहील
ट्रम्प म्हणाले की करार जवळ आला आहे, परंतु करार होईपर्यंत इराणवरील नौदल नाकेबंदी सुरूच राहील.














