डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली आहे. २०२३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची आठवण करून देत, दोन्ही गटांनी तीन वर्षे भांडणाचे नाटक केले आणि आता दुसरा गटही सत्तेच्या दिशेने निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याच्या चर्चेनंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यावेळी आपण केलेल्या विधानाची आठवण त्यांनी करून दिली. दोन्ही राष्ट्रवादी गटांनी तीन वर्षे भांडणाचे नाटक केले आणि आता दुसरा गटही सत्तेच्या दिशेने निघाला असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
“हे पवारांचं जंतरमंतर आहे”
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून भाजपच्या दिशेने गेला, तेव्हाच आपण याबाबत भाष्य केले होते.
“अर्थात पुढे तीन वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीका केली.
या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष आणि सत्तेच्या समीकरणांवरही त्यांनी भाष्य केले.
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडले होते?
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह तत्कालीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत पक्षातील काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरूनही निवडणूक आयोगापर्यंत लढाई गेली. त्यानंतर दोन्ही गटांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवली.
आता डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्या पक्षाने पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्याने राज ठाकरे यांनी २०२३ मधील घडामोडींशी त्याची तुलना केली आहे.
डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षाची भूमिका
केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
या विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पाठिंब्याची भूमिका जाहीर केली होती. परिसीमन ही घटनात्मक प्रक्रिया असून ती कधीतरी पूर्ण करावी लागणार आहे, असे पवार यांनी सांगितल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
मात्र, पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा अभ्यासल्यानंतरच अंतिम भूमिका स्पष्ट केली जाईल, असे म्हटले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही विधेयकाच्या तरतुदी तपासणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे पक्षाच्या भूमिकेबाबत काही प्रमाणात मतभेद आणि संभ्रम असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस आणि ठाकरे गटाकडूनही टीका
शरद पवार यांच्या पक्षाने डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करूनच भूमिका ठरवायला हवी होती, असे म्हटले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रस्तावित विधेयकावर टीका केली आहे. भाजपला निवडणुकीतील राजकीय फायदा मिळवण्यासाठी मतदारसंघांची रचना बदलायची असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, संजय राऊत यांनीही शरद पवार यांच्या पक्षावर टीका करत भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
विशेष अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधी पक्षांमध्ये मतभेद समोर येत असताना केंद्र सरकारसमोर घटनादुरुस्ती विधेयकासाठी आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचे आव्हान आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत आठ खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची भूमिका संसदेतील संख्याबळाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. मात्र, विधेयकातील तरतुदी, राज्यांचे प्रतिनिधित्व आणि जागावाढीचे प्रमाण यावर पक्षाने अटी मांडल्या आहेत.
राज ठाकरे यांच्या ताज्या टीकेमुळे डिलिमिटेशनच्या मुद्द्याला महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाची आणखी एक किनार मिळाली आहे. आता शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांच्या वक्तव्याला काय उत्तर दिले जाते, तसेच संसदेतील मतदानावेळी पक्षाची अधिकृत भूमिका काय असते, याकडे लक्ष लागले आहे.









