मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही फोडली असे म्हणणे चुकीचे आहे. या दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळेच फूट पडली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत होते.
फडणवीस म्हणाले, “शिवसेना सर्वप्रथम कुणी फोडली? बाळासाहेब ठाकरेंच्या काळात 1992 मध्ये शरद पवारांनी छगन भुजबळ आणि 13 आमदारांना घेऊन फूट पाडली होती. त्याच शरद पवारांसोबत युती करूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा किंवा शरद पवारांचा पक्ष फुटला, तरी त्यासाठी आम्हाला दोष देता येणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले, “एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक होते. पण जेव्हा त्यांना समजले की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी त्यांचे पंख छाटत आहेत, तेव्हा नाराजी वाढली. मविआच्या काळात त्यांच्या खात्याच्या बैठका देखील आदित्य ठाकरे घेऊ लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने हिंदुत्वाबाबत ते काही बोलू शकत नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांची महत्त्वाकांक्षा आणि नाराजी दोन्ही वाढली.”
राष्ट्रवादी काँग्रेसमधील परिस्थितीबाबत फडणवीस म्हणाले, “शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांना पाहिले जात होते. पण सुप्रिया सुळे यांचे महत्त्व वाढल्याने अजित पवारांना बाजूला केले जाऊ लागले. आमच्या पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांना होती, पण त्यांनी पाठिंबा काढून घेतला आणि अजित पवारांना ‘व्हिलन’ ठरवले. त्यामुळे आपले राजकारण संपवले जात असल्याची जाणीव अजित पवारांना झाली.”
संबंधित बातम्या





फडणवीसांच्या मते, दोन्ही पक्षांची फूट ही अंतर्गत बंडाळी आणि महत्त्वाकांक्षेमुळे झाली, बाहेरील हस्तक्षेपामुळे नव्हे.