टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शरद पवारांचा मोठा निर्णय! रोहित पवारांना दिली जबाबदारी, जवळपास 6 वर्षांनंतर…

On: May 23, 2026 11:08 AM
Follow Us:

शरद पवार यांनी एक मोठी जबाबदारी नातू आणि आमदार रोहित पवार यांना दिली आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे साहेबांचे आभार मानले आहेत.

शरद पवारांचा मोठा निर्णय! रोहित पवारांना दिली जबाबदारी, जवळपास 6 वर्षांनंतर...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, ज्यामुळे शरद पवार गटात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा होती. या भेटीमुळे शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार नाराज असल्याच्या आणि पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी रोहित पवारांवर एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

कोणती जबाबदारी देण्यात आली?

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून, स्वतः रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. रोहित पवार मागील ६ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेवर ‘सदस्य’ म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत रोहित पवारांनी पोस्टमध्ये, ‘बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या हाती धुरा असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि संस्थेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार! मागील गेली सहा वर्षे संस्थेवर सदस्य म्हणून आणि सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावतीच आहे, असं मी मानतो. भविष्यातही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली सर्वांच्या सहकार्याने अधिकाधिक चांगल्या कामाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील’ असे म्हटले आहे.

दुसरीकडे, सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी केवळ त्यांचाच एक अर्ज आल्याने ही निवड निश्चित झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरद पवारांनी संस्थेच्या भावी वाटचालीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले:

जागतिक दर्जाचे शिक्षण: ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा स्वीकार करून रयत संस्थेला जगाच्या पाठीवर आघाडीवर नेण्याचा मानस आहे.

आंतरराष्ट्रीय भागीदारी: परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी ‘रयत’ला जोडून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न केला जाईल.

विद्यार्थ्यांना मदत: यंदाच्या वर्षात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच संस्थेला हितचिंतकांकडून मिळालेल्या मोठ्या देणगीबद्दल त्यांनी आभार मानले असून संस्थेत नाविन्यपूर्ण बदल करण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now