Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. या आंदोलनाआधीच राजू शेट्टी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Shaktipeeth Highway: महायुती सरकारच्या (Mahayuti Government) महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला सध्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे बाधित होणाऱ्या 12 जिल्ह्यांतील शेतकरी, शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे. वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे–बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. मात्र या आंदोलनाआधीच पोलिसांच्या फौजफाटा राजू शेट्टींच्या घरी दाखल झाला आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी स्वत:त सहभागी होणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

पोलीस राजू शेट्टींच्या घरी पोहोचले
तर शक्तीपीठ महामार्गाच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्याने आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पुणे- बंगळुरू महामार्गावर आज रास्ता रोको असल्याने आज सकाळी राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर नोटीस दिली आहे. आता राज शेट्टी नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सतेज पाटलांचा इशारा
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पोलीस बळाचा वापर करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन महामार्गावर किती वेळ सुरू राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.