उदनवाडी येथील खून घटना; पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा
सांगोला – मौजे उदनवाडी ता. सांगोला येथील जमीन गट नंबर मध्ये आरोपींनी गैरकायदयाची मंडळी जमवुन जमीन तुम्ही खरेदी का केली, या जमीनीला आम्ही कुळ आहे या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून लष्करात नोकरीस असलेल्या व्यक्तीने त्याचेकडील बंदुकीमधील गोळी फायर करून जिवे ठार मारले प्रकरणी आरोपीस भादविक 302 करीता दोषी धरून जिवनाच्या अंतापावेतो जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रूपये द्रव्यंदडाची शिक्षा पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश क. 1 डी एन सुरवसे साो यांनी आज सुनावली.यातील आरोपी हा अटक झाल्यापासून जेलमध्ये होता. त्यास जामीन मिळालेला नव्हता.
आरोपींनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचा जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश उल्लंघन केले म्हणून आरोपींविरूध्द सांगोला पोलीस स्टेशनला गुरनं. 232/2014 भादवि 302, 307, 143, 147, 148, 149 सह आर्म अॅक्ट 3, 25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे कामी तपासी अधिकारी पोनि अजय कदम यांनी तपास करून आरोपीविरूध्द पंढरपूर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. त्याप्रमाणे सत्र खटला क. 57/2014 प्रमाणे कामकाज चालले.
सदर गुन्हा सिध्द करण्याकरीता सरकारपक्षातर्फे एकुण 18 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये फिर्यादी , जखमी साक्षीदार हे या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तसेच पंच साक्षीदार, वैदयकीय अधिकारी डॉ एस बी भुई सोलापूर तसेच जखमींवर उपचार करणारे डॉ. डी डी गावडे सांगोला तसेब पोलीस कर्मचारी सपोनि ज्ञानेश्वर करचे, सपोनि महादेव कुंभार, पोना सावजी व इतर पोलीस कर्मचारी यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या.
याबाबत सरकारपक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले. या एकंदरीत झालेल्या पुराव्याचे अवलोकन करून आरोपीस भादवि 302 करीता दोषी धरून जिवनाच्या अंतापोवेतो जन्मठेपेची व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. इतर आरोपींची पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली. यात सरकारी वकील म्हणुन अॅड. सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले. कोर्ट पैरवी म्हणुन सांगोला पोलीस स्टेशनचे पोकों 933 राजू माने कार्यरत होते.
इतर बातम्या :