Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी भाषेसंदर्भातील विजयी मेळाव्यात बोलताना तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर असा सूचक इशारा दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा राज्य सरकारकडून 29 जून रोजी करण्यात आली होती. त्यानंतर विजयी मेळाव्याचं आयोजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीतील डोममध्ये करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. सरकारला फक्त मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली. आजच्या मेळाव्यात किंवा यापुढं देखील मराठीच्या मुद्यावर कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असेल, असं राज ठाकरे म्हणाले. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या सर्व तमाम मराठी भगिनींनो बांधवांनो मातांनो, खरंतर दोघांची भाषणं संपली की एकत्र आरोळ्या ठोका, खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूनं एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली, असं राज ठाकरे म्हणाले.

खरंतर आजचाही मेळावा शिवतिर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता, मैदान ओसंडून वाहिला असता, पाऊस आहे, पावसात फारशा जागा मिळत नाहीत मुंबईत, म्हणून आज तुम्हाला इथं यावं लागलं. बाहेर उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, आता स्क्रीनवर आटपा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
मुलाखतीत म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, बऱ्याच चॅनेलचे कॅमेरे जमले आहेत, संध्याकाळी सगळं सुरु होईल, काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती, कोणी हसलं का, काय बोलतात का?मूळ विषय सोडून इतर गोष्टीत इंटरेस्ट असतो, असं राज ठाकरे म्हणाले.
तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात
कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेनं कुणी पाहायचं नाही, ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी घोषणा द्यायची हा प्रश्न अनाठायी होता, काही गरज नव्हती, कुठून हिंदीचं अचानक आलं कळलं नाही, हिंदी कशासाठी, कोणासाठी हिंदी,लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय, कोणाला विचारयचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना विचारायचं नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही लादणार हे चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर,एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिलं, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले, मला म्हणाले आम्ही काय म्हणतोय एवढं समजून घ्या, ऐकून घ्या, दादा तुम्हाला सांगतो तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. कुठून त्रिभाषा सूत्र आणलं, त्रिभाषा सूत्र आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी त्रिभाषा सूत्र आणलं गेलं. कोर्टात, हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात इंग्रजीचा वापर होतो, कुठं आहे भाषा सूत्र, नव्या शिक्षण धोरणात नाही, इतर कुठल्याही राज्यात नाही, दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाहीत, महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं, हे राज्यकर्त्यांना समजलं असेल , त्याशिवाय का माघार घेतली, असं राज ठाकरे म्हणाले.
दादा भुसेंना म्हटलं, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश कुठली तिसरी भाषा आणणार आहात. हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी न बोलणारी राज्या आर्थिकदृष्ट्या प्रगत, हिंदी बोलत नसलेल्या राज्यात नोकरीसाठी हिंदी भाषा बोलणारे लोक येत आहेत. भाषा कोणतीही श्रेष्ठ असते, मराठी, गुजराती, बंगाली असेल, हिंदी असेल, एक भाषा उभी करायला खूप ताकद लागते, लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते, भाषा अशाच उभ्या राहत नसतात, हे भाषेचं नवीन कुठून आणलं असा सवाल राज ठाकरेंनी केला.
अमित शाह म्हणाले, ज्याला इंग्रजी येतेल त्याला लाज वाटेल, अरे तुम्हाला येत नाही. या संपूर्ण हिंद प्रांतावर १२५ वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. या प्रदेशांवर राज्य केलं, आम्ही मराठी लादली? गुजरात, मध्यप्रदेश, पंजाबवर, अटकपर्यंत मराठी साम्राज्य पोहोचलेलं आम्ही मराठी लादली? का असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी केला.