Mumbai Train Accident: मध्य रेल्वेमार्गावर सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाला.
Mumbai Train Accident: मध्य रेल्वेमार्गावर (Mumbai Train Accident) आज (9 जून) सकाळी एक मोठा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 5 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते. नेमकं काय घडलं होतं, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही.
सदर अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत पुष्पक ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशी दिसत आहेत. या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे फाटलेले दिसत आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली असून यापैकी काही प्रवाशांना मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा गेल्या काही दिवासांतील मोठा अपघात असून रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेची नेमकी व्याप्ती अद्याप कळू शकलेली नाही. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हे प्रवासी 30-35 वयोगटातील असल्याचंही समजतंय.
कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डने दिली माहिती-
पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पाच जण एक्स्प्रेसमधून पडले. या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे. मात्र प्रवासी नेमके कसे खाली पडले, हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान अॅम्ब्युलन्समधून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पुष्पक एक्स्प्रेस मुंबई ते लखनौदरम्यान धावते. सीएसएमटीवरुन सकाळी 8.25 वाजता पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. पुष्पक एक्स्प्रेसचा पुढचा थांबा कल्याण रेल्वे स्थानक होता. मात्र दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आल्यावर हे प्रवासी रेल्वेतून पडले.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले?
सदर घटना अत्यंत दुर्देवी आहे. प्रशासनाने या अपघातामागील कारण शोधलं पाहिजे, असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. सदर घटना गर्दीमुळे झाल्याचं दिसून येतंय. प्रवाशांना कोणी धक्का दिला का?, याबाबत माहिती मिळणं गरजेचं आहे, असं नरेश म्हस्के यांनी सांगितले.
माजी खासदार राजन विचारे काय म्हणाले?
मुंबई ते कल्याण या मार्गावरील लोकल आता कमी पडत आहे. लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. मोठ्या प्रमाणात लोकलमध्ये गर्दी असते. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केली.
विद्या चव्हाण संतापल्या, अपघातावर काय म्हणाल्या?
सदर अपघातासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. अपघात झाला तेव्हा रेल्वे स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिका नव्हती. मुंबई लोकलची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. प्रवाशांना अद्याप चांगली सुविधा मिळत नाहीय. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते, लोक दरवाजाबाहेर उभे राहून प्रवास करतात. रेल्वेला उशीरा होतो, तेव्हा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. यावेळी अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवाशी लोकलमध्ये चढतात, असं माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या.