Manikrao Kokate : मला जंगली रमी येत नाही, त्यासाठी मोबाईल नंबर, बँक अकाऊंट जोडावं लागतं, दोषी असेल तर राजीनामा देतो : माणिकराव कोकाटे

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Manikrao Kokate : तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, असेही माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळात मोबाईलमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्याने कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहे. ऑनलाइन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होणार का? असा सवाल सर्व स्तरातून विचारला जात आहे. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचे वागणं अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता अजित पवार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की त्यांची खुर्ची शाबूत राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले की, हा छोटा विषय आहे. हा विषय एवढा लांबला का? हे कळत नाही. ऑनलाइन रमी तुम्हाला माहिती आहे का? त्याला बँकेचे खाते जोडावे लागते. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण असताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांना माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिलाय.

माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही

माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यांना सभागृहात आत येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. 30 सेकंद गेम स्कीप करता येत नाही. माझा व्हिडिओ 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते, असे त्यांनी देखील यावेळी म्हटले.

दोषी असेल तर राजीनामा देतो

मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon